भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले....

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जुलै 2019

मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

मेढा :  ''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'माझ्यापेक्षा पत्रकारांनाच ते चांगलं माहित आहे. माझ्या सातारा-जावळी मतदारसंघाचे हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेणार आहे.' यावेळी तिथे उपस्थित असलेले मेढा येथील कट्टर शिवसैनिक संजय सपकाळ यांच्याकडे इशारा करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'सपकाळजीच तुम्हांला नेमकं काय ते सांगतील.' 

नेमके शिवसेना की भाजप असे काही न सांगता शिवेंद्रसिंहराजे तिथून निघून गेले. त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत मौन बाळगत चालू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेढयाचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivedraSinghRaje Bhosale silenced on BJP entry