...तर काट्यानेच काटा काढावा लागेल- शिवेंद्रराजे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

'माझा काटा काढायला कोण आलं तर 'आरे ला का रे' करावं लागेल. काट्याने काटा काढवाच लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवेंद्रराजे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत आपल्या विरोधकांना दिला.

सातारा : 'माझा काटा काढायला कोण आलं तर 'आरे ला का रे' करावं लागेल. काट्याने काटा काढवाच लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसमधून नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले शिवेंद्रराजे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत आपल्या विरोधकांना दिला.

''राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मी त्यांना कुठलेही आश्वासन दिले नव्हते. आपण खासदारांबरोर चर्चा करु असे त्यांनी सांगितले होते. पण याची खात्री कोण घेणार," असा सवालही शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला. समोर कुणीही येऊन उभे राहिले तरी मी भाजपकडून निवडणूक लढणार आहे, असेही शिवेंद्रराजे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमीका स्पष्ट केली. ते म्हणाले,'' माझ्या मतदारसंघातील अंतर्गत कुरघोड्या मी वेळो वेळी कानावर घातल्या होत्या. पुण्याच्या बैठकीत सुद्धा याची विस्तृत माहिती दिली होती. त्यांनी चर्चा करू म्हणून सांगितलं. पण नुसती चर्चा किती दिवस?"

मी पक्षाला फसवलं नाहीये. लोकसभेला माझ्या मतदार संघातून मताधिक्य मिळवून दिले नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर देशाने दोन वेळा शिक्कामोर्तब केले आहे. लोकसभेला पक्षा बरोबर राहून काम केलं. आता नवीन निवडणूक  आहेत. त्या वेळी पक्ष सोडण्याची भूमिका मी घेतली.'' गेली अनेक वर्षे आमचे कुटुंब पक्षाबरोबर आहे. इतक्या वर्षांनंतर एखाद्या घराण्याला असा निर्णय का घ्यावा लागतो, याचा विचार पक्ष नेतृत्वाने करायला हवा, असेही शिवेंद्रराजे म्हणाले. जिल्हा बँक ही राजकारण विरहित सहकारी संस्था आहे, पण जे शेवटी माझ्यावर कुरघोड्या करणार त्यांना तर मी लक्षात ठेवणार आहे, असाही इशारा त्यांनी दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendraraje Warns Oppsition in satara