शिवेंद्रसिंहराजे बनताहेत ‘पॉवरफुल’

शिवेंद्रसिंहराजे बनताहेत ‘पॉवरफुल’

सातारा - जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत नाट्यमय घडामोडीत ज्येष्ठ नेते रामराजेंनंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंची ताकद वाढल्याचे स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे राष्ट्रवादीतून बाजूला झाल्यापासून शिवेंद्रसिंहराजे प्रचंड आक्रमक झाले असून त्याचा फायदा त्यांना होताना दिसत आहे. आता यापुढे लोकसभेपर्यंत त्यांचा हा आक्रमकपणा असाच राहिल्यास लोकसभा निवडणुकीत वेगळे चित्र पाहायला मिळणार आहे. 

जिल्ह्याच्या राजकारणावर राजघराण्यांची असलेली पकड जिल्हा परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडीनंतर अधिकच घट्ट झाल्याचे दिसून आले. खासदार उदयनराजेंना बाजूला ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी निवडणूक लढवत त्यात सर्वाधिक यश मिळविले.

यामध्ये विधान परिषदेचे सभापती रामराजेंचा मोठा वाटा राहिला. त्यांच्याच रणनीतीतून पक्षाने जिल्हा परिषदेच्या ४० जागा जिंकल्या तर ११ पंचायत समित्यांवर सत्ता मिळविली. या निवडणुकीत रामराजे नाईक- निंबाळकर आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे किंगमेकर ठरले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचार प्रारंभावेळी खासदारांना बाजूला ठेऊन निवडणूक लढण्याची सूचना सर्वांना केली होती. त्यानुसार आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी खासदार उदयनराजेंशी दोन हात करत त्यांना अंगावर घेतले. एकूणच पवारांच्या सभेनंतर शिवेंद्रसिंहराजे सर्वाधिक आक्रमक झाले. त्यांच्या या आक्रमक प्रतिमेचा त्यांना या निवडणुकीबरोबरच पदाधिकारी निवडीतही फायदाच झाला. जावळी तालुक्‍यातील ग्रामीण भागाने आमदारकीच्या निवडणुकीत सर्वांत जास्त मते शिवेंद्रसिंहराजेंना दिली होती. यातून उतराई होताना शिवेंद्रसिंहराजेंनी थेट शरद पवारांशी फोनवर बोलून जावळीसाठी उपाध्यक्षपद मिळविले.

खासदार उदयनराजेंविरोधातील भूमिका आणि आक्रमकता येथे कामाला आली. आजवर शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका शांततेचीच होती. पण, मनोमिलन फिस्कटल्यानंतर व पत्नी वेदांतिकाराजेंच्या पराभवानंतर ते खऱ्या अर्थाने आक्रमक झाले. शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांचा हा आक्रमकपणा लोकसभा निवडणुकीपर्यंत कायम ठेवल्यास यावेळेस राष्ट्रवादीचा खासदार बदलण्यास पक्षाला यश येईल. कारण सातारा व जावळीतूनच खासदारकीच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्‍य देण्याची ग्वाही त्यांनी खुद्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवारांना दिली आहे. त्यामुळे खासदारकीच्या निवडणुकीतही शिवेंद्रसिंहराजेंची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

शशिकांत शिंदे शांतताप्रिय..!
जिल्ह्याच्या राजकारणात आमदार शशिकांत शिंदे यांचे वेगळे वजन आहे. पण, जिल्हा बॅंकेतील उपोषणाच्या प्रकरणापासून ते थोडे शांत झाले आहेत. तसेच त्यांनी आपल्यातील आक्रमकपणा कमी करून मुद्द्याचेच बोलण्यावर भर दिला आहे. त्यामुळे रामराजेंनंतर शशिकांत शिंदे असे सूत्र आता बदलत असून शशिकांत शिंदेंची जागा शिवेंद्रसिंहराजे घेऊ लागल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com