जमान्यासोबत जाण्यात शहाणपणा - शिवेंद्रराजे

Shivendrasinhraje-Bhosale
Shivendrasinhraje-Bhosale

कुडाळ - राजकीय वातावरण बदलत आहे. त्यामुळे आता बदलत्या वातावरणाप्रमाणे मलाही बदलावे लागेल. त्यामुळे ‘जमाने के साथ चलना चाहिए, नही तो मै पिछे रह जाऊंगा,’ असा सूचक इशारा देत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या भाजप प्रवेशाला ग्रीन सिग्नल दाखवल्याची चर्चा आहे. 

कुडाळ (ता. जावळी) येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘जावळी तालुक्‍यातील महू-हातगेघर व बोंडारवाडी धरण, साताऱ्यातील मेडिकल कॉलेज, एमआयडीसीचे प्रलंबित विषय प्रलंबित आहेत. सातारा विधानसभा मतदारसंघातील विकासकामे रखडली आहेत. मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर कार्यकर्त्यांच्या भावनांचा व जनरेट्याचा विचार करावाच लागेल. त्यामुळे विकासकामे देण्याची क्षमता जिथे आहे त्यांच्याबरोबरच जाणं हे जनतेच्या दृष्टीने योग्य राहील.’’

राष्ट्रवादी पक्ष सक्षम नाही, असे माझे मत नाही. मात्र, देशात आणि राज्यात परिवर्तनाची लाट आहे, त्याचा विचारही करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.  

गेल्या ४० वर्षांपासून राष्ट्रवादी व शरद पवारांशी इमानदारीने व निष्ठेने राहिलो. पक्षाच्या आदेशाला कधीही तडा जाऊ दिला नाही, पवारसाहेबांचा आदेश प्रमाण मानून पक्षाचे काम केले. मात्र, गेल्या दहा वर्षांत पक्षाकडून अपेक्षित सहकार्य, मदत मिळाली नाही, याची खंत आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्येही राष्ट्रवादीला मतदारसंघातून ४२ हजारांचे मतदान दिले. प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले. मात्र, पक्षाने व ज्यांच्यासाठी काम केले त्यांच्याकडून मात्र सापत्न वागणूक मिळाली, अशी खदखदही त्यांनी जाहीरपणे व्यक्त केली. 

शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजे हे राष्ट्रवादीसोबतच आहेत, असे वक्तव्य केले आहे. त्यावर ते म्हणाले, ‘‘शरद पवार हे भाऊसाहेब महाराजांपासून आमच्या घरांशी कौटुंबिक संबंध जोपासून आहेत. शरद पवारांचा माझ्या राजकीय वाटचालीत खूप मोठा सिंहाचा वाटा आहे, मात्र, महाराष्ट्रासह देशात आज जी परिस्थिती आहे हे पाहणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. भविष्याचा विचार करून पुढे काय होणार याचाही विचार करावा लागेल.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com