" शिवेंद्रसिंहराजेंना राष्ट्रवादीने निमंत्रण दिले तर..."

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मी विरोधात असूनही 44 हजारांच्या मताधिक्‍क्‍याने सातारा - जावळी मतदारसंघातून निवडून आलो आहे असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

सातारा : सत्तेत असल्यावर थोडी गतीने कामे होतात. आता विरोधी पक्षात असल्याने विकास कामे करताना थोडा संघर्ष करावा लागेल. त्यामुळे जिथे आहे तिथे मी निष्ठेने राहणार आहे. लोक कामे पाहून मतदान करतात, असे मत साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले. आपण राष्ट्रवादीच्या संपर्कात नसल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.

सकाळचे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

मंत्रालयात शपथविधी झाल्यानंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. विकास कामे होत नाहीत म्हणून अनेक आमदार राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले. आता राष्ट्रवादीची सत्ता आली आहे, नेमकी तुमची भुमिका काय असेल या प्रश्‍नावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मागील वेळी वेगळी परिस्थिती होती. सध्या भाजपकडे 105 आमदार असून तोच सर्वात मोठा पक्ष आहे. मुळात सत्तेत असल्यावर थोडी गतीने कामे होतात. आता आम्ही विरोधात बसणार असल्याने पूर्वीसारखेच विकास कामांसाठी आम्हाला संघर्ष करावा लागेल.
 
राष्ट्रवादी कॉंग्रेसने निमंत्रण दिले तर ?

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून तुम्हाला निमंत्रण आले तर काय निर्णय घ्याल, यावर ते म्हणाले, इकडून तिकडे म्युझिकल चेअरसारखे जाणे योग्य नाही. जिथे आहे तिथे निष्ठेने राहणार आहे. मी ज्या घराण्यातून आलाे आहे आणि माझे वडील राजकारणात हाेते ते कधीही सत्तेसाठी इकडून तिकडे गेले नाहीत. मी विरोधात असूनही 44 हजारांच्या मताधिक्‍क्‍याने सातारा - जावळी मतदारसंघातून निवडून आलो आहे. त्यामुळे कामे होत नाहीत असे नाही. पाच वर्षे विरोधात असताना कामे झाली नसती तर इतके मताधिक्‍क्‍य मिळाले नसते.

हेही वाचा -  आयाराम विराेधी बाकांवरच ! ; आता विकासाचे काय ?

मी कोणाच्याही संपर्कात नाही

आता तुम्ही विरोधी पक्षात आहात. तुमची कामे होतील का, या प्रश्‍नावर त्यांनी थोडा संघर्ष करावा लागेल, यात काहीही नवीन नाही, असे त्यांनी नमुद केले. तुम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या संपर्कात आहात अशी चर्चा आहे, यावर ते म्हणाले, मी कोणाच्याही संपर्कात नाही. भाजपमध्ये राहून चांगल्याप्रकारे काम करणार आहे. पवारसाहेबांची मी भेट घेतली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinhraje Says He Will Be Wtih His Party