उदयनराजेंवर शिवेंद्रसिंहराजे भाेसले नाराज

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जुलै 2019

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी रात्री खासदार शरद पवार यांना मोबाईलवर संपर्क साधला. काही गोष्टीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ मागितली. 

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साेमवारी साताऱ्यात पक्षाच्या तीन आमदारांशी सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. आगामी विधानसभेच्या दृष्टीने पक्षापुढे जिल्ह्यात कोणत्या अडचणी आहेत, यावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी लवकरच मुंबईत बैठक घेण्याचा निर्णय झाला. दरम्यान, साताऱ्यात असूनही आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. 
तिवरे धरण येथे घटनास्थळी भेट दिल्यानंतर खासदार शरद पवार रविवारी (ता. 7) रात्री कोयनानगर येथे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याकडे मुक्कामी राहिले होते. साेमवारी सायंकाळी सव्वापाचच्या दरम्यान ते साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात आले. त्या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार बाळासाहेब पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्या वेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील, सुधीर धुमाळ, निवास शिंदे, समिंद्रा जाधव उपस्थित होते. 
त्यानंतर "रयत'चे कार्याध्यक्ष अनिल पाटील यांच्या दालनात ते थांबले. तेथेच त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील व रामराजे यांच्यासोबत सुमारे अर्धा तास कमराबंद चर्चा केली. त्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात काय परिस्थिती राहील, याचा आढावा श्री. पवार यांनी घेतला, तसेच साखर कारखानदारी पुढील अडचणीवरही या वेळी चर्चा झाली. 
शरद पवार साताऱ्यात असतानाच सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत होते. श्री. पवार "रयत'च्या मुख्यालयात आल्यानंतर शिवेंद्रसिंहराजे त्यांना भेटण्यास जातील, असे वाटले होते. मात्र, ते "रयत'च्या मुख्यालयाकडे फिरकलेही नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा रामराजे व शिवेंद्रसिंहराजे यांना टार्गेट करून टीका केली होती. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे नाराज झाले आहेत. त्यांच्या भाजपशी जवळीकेबाबतही चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवेंद्रसिंहराजे यांची आजच्या बैठकीला अनुपस्थिती लक्षवेधी ठरली आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी रात्री खासदार शरद पवार यांना मोबाईलवर संपर्क साधला. काही गोष्टीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी वेळ मागितली. मात्र, पवारांनी खूपच गडबड असल्याचे सांगत शनिवारी अथवा रविवारी चर्चा करू, असे सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivendrasinhraje is unhappy with udayanraje