शिवेंद्रसिंहराजे भाजपाच्या छत्रछायेखाली

सिद्धार्थ लाटकर
सोमवार, 29 जुलै 2019

राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकून भाजपात प्रवेश करा सर्मथकांची भावना.

सातारा ः प्रवाहाबरोबर आपण राहणे आवश्‍यक असल्याने सातारा जावळीच्या जनतेच्या हितासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकून भाजपात प्रवेश करावा असा सूर आज (सोमवार) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांनी बैठकीत आळवला. शिवेंद्रसिंहराजेंनी आपली भुमिका गुलदस्त्यात ठेवली असली तरी बैठकीनंतर काही मिनीटांतच समर्थकांकडून राजेंचे पावसापासून सरंक्षण व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी धरलेल्या छत्रीचे छायाचित्र सोशल मिडियात व्हायरल झाले. 
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभुमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आयोजिलेल्या उमेदवारांच्या मुलाखतीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अनुपस्थित राहिले. त्यावेळेपासून ते भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सातारा जिल्ह्यात रंगली आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात अस्वस्था पसरली आहे. दरम्यान आज (सोमवार) शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थित शहरातील समर्थकांची सुरूची बंगल्यात बैठक झाली. या बैठकीत आजी-माजी पालिका, जिल्हा परिषद सदस्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसला राम राम ठोकून भाजपात जाणे हिताचे असल्याची भावना व्यक्त केली. आपण जो निर्णय घ्याल तो आम्हांला मान्य असेल अशी ही पुष्टी जोडली. यावेळी शिवेंद्रसिंहराजेंनी प्रवाहाबरोबर आपण असायला हवे या मताचा मी देखील आहे. परंतु सातारा जावळीच्या जनतेच्या हितासाठी योग्य वेळी निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. दरम्यान कुसवडे (ता. सातारा) येथे नुकत्याच काही दिवसांपुर्वी झालेल्या एका कार्यक्रमानंतर मोठा पाऊस आला. त्यावेळी राजेंना पाऊस लागू नये यासाठी कार्यकर्त्याने छत्री धरली. ही छत्री तेथील ज्येष्ठ नागरीकाने कार्यकर्त्यास दिली. या छत्रीवर भाजपाचे कमळाचे चिन्ह असल्याने उत्सुकता म्हणून एकाने राजेंचे छायाचित्र टिपले. नेमके हेच छायाचित्र सध्या सातारा जावळीत सोशल मिडियातून व्हायरल होऊ लागले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivindersinghraje under the umbrella of BJP ?