शाहीर विभूतेंच्या पाचव्या पिढीचा डफ ‘मॉरिशस’मध्ये कडाडणार

शाहीर विभूतेंच्या पाचव्या पिढीचा डफ ‘मॉरिशस’मध्ये कडाडणार

१८ व्या शतकापासून तडफदार बाण्याने कडाडणाऱ्या बुधगावच्या शाहीर विभूते घराण्यातील पाचव्या पिढीतील शाहीर प्रसाद विभूतेचा डफ आता ‘मॉरिशस’मध्येही वाजणार आहे. प्रसादच्या शाहिरीला सोशल मीडियावर मिळालेला प्रतिसाद पाहून मॉरिशस येथील मराठी सांस्कृतिक केंद्राने त्याला आणि पथकाला निमंत्रित केले आहे. प्रसादचे आजोबा राष्ट्रशाहीर बापूसाहेब विभूतेचा डफ १९८१ ला प्रथमच जपानमध्ये कडाडला होता. त्यानंतर त्यांच्या नातूला ही संधी मिळाली आहे.

बुधगाव (ता. मिरज) येथील विभूते घराण्याचे मूळ शाहीर शिवाप्पा विभूते हे १८ व्या शतकात राजदरबारात भेदिक शाहीर म्हणून कार्यरत होते. तुरा पक्षाचे शाहीर अशी त्यांची ख्याती होती. त्यांचे पुत्र विरूपाक्ष विभूते यांनी भेदीक शाहिरीचा वारसा पुढे चालवला. पारतंत्र्याच्या काळातही त्यांनी शाहिरी परंपरा जपली.

विरूपाक्ष यांचे पुत्र बापूसाहेब यांनी भेदिक आणि भक्तिगीताचा वारसा स्वीकारला; परंतु केवळ भेदिक आणि भक्तिगीतातून समाजप्रबोधन होणार नाही हे  जाणले. त्यामुळे राष्ट्रीय शाहिरी गाण्याचा निर्णय घेतला. स्वातंत्र्यानंतरच्या काळात चिंचणी (ता. तासगाव) येथील क्रांतिशाहीर गणेश दत्तात्रय दीक्षित यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यानंतर राष्ट्रीय शाहिरांचे विभूते घराणे अशी ओळख बापूसाहेबांनी निर्माण केली.

तडफदार बाण्यातून पहाडी आवाजात अंगावर रोमांच उभे करत इतिहास उभे करणारे शाहीर म्हणून बापूसाहेबांनी देशभर लौकिक मिळवला. देश स्वतंत्र झाल्यानंतर  संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याच्या काळात त्यांचा डफ कडाडला. त्यानंतर शाहीर म्हणजे बापूसाहेब असे समीकरणच बनले होते. १९८१ मध्ये जपानला जाण्याची संधी मिळाली. तेथे त्यांचा डफ कडाडला. महाराष्ट्राची ही कला सातासमुद्रापार त्यांनी पोहोचवली. त्यांचा वारसा पुत्र आदिनाथ यांनी सुरू ठेवला.

१९८४ मध्ये विद्यार्थी दशेत त्यांना शाहिरी कलेसाठी दिल्लीतील ‘सीसीआरटी’ची शिष्यवृत्ती मिळाली. आदिनाथ यांचे पुत्र प्रसादला २०१८-१९ मध्ये ‘सीसीआरटी’ची शिष्यवृत्ती मिळाली.
प्रसाद सध्या धामणी (ता. मिरज) येथे ए. बी. पाटील इंग्लिश स्कूलमध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. शास्त्रीय संगीत आणि सतार वादन शिकत आहे. एमए मराठी आणि संगीत पदवी घेतली आहे. सोशल मीडियावर प्रसादच्या शाहिरीला हजारो ‘लाईक्‍स’ मिळत आहेत. ‘मॉरिशस’मधील मराठी सांस्कृतिक  केंद्राचे अध्यक्ष अर्जुन पुतलाजी यांना सोशल मीडियावर प्रसादची माहिती मिळाली. त्यांनी महाराष्ट्रात काहीजणांशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी प्रसादशी संपर्क साधला व माहिती घेतली. त्यानंतर ‘मारिशस’मधील शाहिरी सप्ताहासाठी प्रसादला निमंत्रण दिले. प्रसादबरोबर त्याचे पथकही रवाना होणार आहे. संपूर्ण पथकाला मिळालेले निमंत्रण कौतुकास्पद आहे.

२७ फेब्रुवारी ते ४ मार्चपर्यंत हा कार्यक्रम आहे. मराठी भाषा दिन, शिवजयंती, महाशिवरात्री असा संगम साधून मॉरिशसला सप्ताह साजरा होत आहे. त्यामध्ये महाराष्ट्राची गाथा, मराठी भाषा आणि भगवान शिव यांच्यावर प्रसाद आणि पथक पोवाडा सादर करतील. आजोबांच्यानंतर नातू प्रसादचा डफ मॉरिशसमध्ये कडाडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com