मिरवणुकांतून प्रबोधनाचा जागर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

शिवजयंतीचा अनोखा जल्लोष - घोषणांनी दुमदुमले मार्ग

शिवजयंतीचा अनोखा जल्लोष - घोषणांनी दुमदुमले मार्ग
कोल्हापूर - ढोल-ताशांचा गजर, युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके, लेसर शोने उजळलेले रस्ते अशा उत्साही वातावरणात शिवजयंती सोहळा आज अविस्मरणीय ठरला. लेक वाचवा, पाणी वाचवा, अवयवदान करा, असे संदेश देत काढण्यात आलेल्या मिरवणुकांतून सामाजिक प्रबोधनाचा जागर घालण्यात आला. संयुक्त जुना बुधवार, मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ, रविवार पेठ, राजारामपुरी, उत्तरेश्‍वर, सोमवार पेठ, व्हीनस कॉर्नरच्या मिरवणुका लक्षवेधी ठरल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी... जय शिवाजी... हर हर महादेव...च्या घोषणांनी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या मिरवणुकांनी रंगत वाढवली. 

पहाटेपासूनच शहरातील वातावरण शिवमय झाले. पन्हाळगडावरून शिवज्योत घेऊन शिवभक्तीची ज्योत मनात जागवत शिवभक्त शहरात येत होते. ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष करत छत्रपती शिवाजी चौकात आल्यानंतर त्यांच्या उत्साहाला उधाण येत होते. भगव्या पताका, चौका-चौकांत लावलेले पोवाडे, रस्त्याच्या दुतर्फा लावलेले भगवे ध्वज यांमुळे सकाळपासूनच गल्ली-बोळांत चैतन्य पसरले होते. सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी शिवजन्मकाळ सोहळ्यासाठी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दिवसभर ठिकठिकाणी शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक व बाबासाहेब देशमुख यांच्या खड्या आवाजातील पोवाड्यांचे सूर वातावरणात रोमांच पसरवत होते. दुपारी तीननंतर कार्यकर्त्यांची मिरवणुकीसाठी लगबग सुरू झाली. डोक्‍यावर फेटे, कपाळावर भगवा तिलक, सलवार कमीज अशा रूबाबदार पोशाखात कार्यकर्ते आपापल्या तालमींजवळ जमा झाले. कपाळावर चंद्रकोर व नऊवारी भगव्या साड्या परिधान केलेल्या महिलांचा उत्साह अवर्णनीय होता. बालचमू हातात भगवे ध्वज घेऊन गल्लोगल्ली फिरत होते.

सामाजिक प्रश्‍नांवर प्रकाशझोत 
प्लास्टिक निर्मूलनासाठी कापडी पिशव्या वापरा, असा संदेश रविवार पेठेने दिला. त्याचबरोबर शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे बांधकाम कधी पूर्ण होणार, विमानतळ विस्तारीकरण कधी करणार, मोठे मैदान कधी मिळणार, रक्षाविसर्जन नदीत नको शेतात टाका, रासायनिक खतांचा वापर कमी करू या अशा आशयाच्या फलकांनी शहरातील समस्यांवर प्रकाशझोत टाकला. कोल्हापूर खंडपीठ जनजागृती रथाद्वारे खंडपीठ होण्यासाठी हालचाली गतिमान व्हाव्यात, अशी मागणी करण्यात आली.

अनिष्ट प्रथांवरही हल्ला
जुना बुधवार पेठेतर्फे आयपीएलवर गुंतवला जाणारा पैसा आणि अन्नाशिवाय मरणारी माणसे, हा विरोधाभास फलकाद्वारे दाखविला होता. अंधश्रद्धा एक सामाजिक शाप, या देखाव्याद्वारे समाजातील अनिष्ट प्रथांवरही हल्ला करण्यात आला होता. त्याचबरोबर पेठेने जपलेला मर्दानी खेळाचा वसा मिरवणुकीत चर्चेचा ठरला. युद्धकलेच्या मुला-मुलींनी थरारक प्रात्यक्षिकांनी शिवभक्तांची मने जिंकली.

Web Title: shivjayanti celebration