शिवरायांचा आठवावा प्रताप...!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 फेब्रुवारी 2017

व्याख्यानांबरोबरच गड-किल्ले मोहिमेत तरुणाईचा सहभाग वाढतोय

व्याख्यानांबरोबरच गड-किल्ले मोहिमेत तरुणाईचा सहभाग वाढतोय

कोल्हापूर- हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की जय... असा जयघोष होताच नसानसांत राष्ट्रप्रेम जागते आणि पुढे लगेचच "हर हर महादेव' असा सूर जयघोषात मिसळून जातो. तरुणाईच्या सळसळत्या रक्ताला आता शिवचरित्रातून विधायक दिशा मिळते आहे. त्यामुळेच विविध निमित्तानं ही तरुणाई आता शिवचरित्रावरील विविध व्याख्यानांचे आयोजन करू लागली आहे आणि गड-किल्ले मोहिमांतही तिचा टक्का वाढला आहे. किंबहुना गड-किल्ले जतन व संवर्धनासाठी तरुणाईने सुरू केलेला सोशल मीडियाचा विधायक वापर अधिक उपयुक्त ठरत आहे. उद्या (ता. 19) सर्वत्र शिवजयंती सोहळा साजरा होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत असलेल्या काही प्रातिनिधिक व्यक्तींशी संपर्क साधला असता त्यांनी विविध निष्कर्ष मांडले.

मैत्रेय प्रतिष्ठानचे संस्थापक व प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके म्हणाले, ""शिवचरित्रांवरील व्याख्यानांसाठी आता उपलब्ध हॉलही पुरत नाहीत. एवढी मोठी गर्दी व्याख्यानांना होते आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी खुल्या मैदानात अशी व्याख्याने तरुणाई आयोजित करू लागली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील तरुणाईही आता शिवचरित्राकडे सजगपणे पाहायला लागली आहे. शिवचरित्र अनुभवताना तरुणाई अक्षरशः भारावून जाते. काही व्याख्यानावेळी, तर एखादा प्रसंग ऐकून तरुण रडताना जवळून पाहिले आहेत. व्याख्याने, गड-किल्ले मोहिमांतून तरुणाईची ऊर्जा विधायक कार्यात सक्रिय होऊ लागली आहे.'' निसर्गवेध परिवाराचे प्रसिद्ध दुर्ग अभ्यासक भगवान चिले म्हणाले, ""गेल्या चार-पाच वर्षांत सोशल मीडियाचा प्रभावी वापर सुरू झाला आणि त्याचा फायदा गड-किल्ले मोहिमेबरोबरच गड-किल्ले स्वच्छता मोहिमांसाठीही होऊ लागला. साहजिकच त्यामध्ये तरुणाई अग्रेसर राहिली आहे. शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग अभ्यासण्यासाठी आणि गड-किल्ल्यांचा इतिहास नेमका काय आहे, याबाबत जाणून घेण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणावर आसुसलेली आहे. भविष्यात या तरुणाईच्या बळावरच गड-किल्ले जतन व संवर्धनाची मोहीम अधिक व्यापक होणार आहे.''

अशीही सजगता
केवळ व्हॉटस्‌ ऍपच्या डीपीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लावणे किंवा "जय शिवाजी-जय भवानी' एवढ्या घोषणांपुरतीच शिवभक्ती नक्कीच महत्त्वाची नाही. त्याच्याही पुढे जाऊन शिवचरित्राचा सर्वांगीण अभ्यास करणे आणि त्याचा आपल्या जीवनात कसा सकारात्मक उपयोग करून घेता येईल, या विषयी तरुणाईमध्ये सजगता निर्माण झाल्याची मतेही यावेळी आवर्जुन नोंदवण्यात आली.

Web Title: shivjayanti in kolhapur