शिवकालीन युद्धकलेला पुन्हा सोनेरी दिवस

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

काही तालमींपुरत्या मर्यादित राहिलेल्या कलेचे लोण आता सर्वत्र 

काही तालमींपुरत्या मर्यादित राहिलेल्या कलेचे लोण आता सर्वत्र 
कोल्हापूर - केरळचा कल्लरीपयटू, तमिळनाडूचा सिलंबम, पाठोपाठ महाराष्ट्रातील कोल्हापुरात शिवकालीन युद्धकलेचे (मर्दानी खेळ) बीज जोमाने अंकुरले आहे. शहरातील काही तालमींपुरत्या मर्यादित राहिलेल्या शिवकालीन युद्धकलेचे लोण आता सर्वत्र पसरले आहे. शिबिर म्हटले, की लाठी-काठीचा समावेश ठरलेला, असेच चित्र दिसू लागले आहे. यानिमित्ताने शरीरासाठी उत्तम व्यायाम असलेल्या युद्धकला प्रशिक्षणाला पुन्हा सोनेरी दिवस आले आहेत. शालेय स्तरावर नियमांच्या भक्कम बांधणीत खेळाच्या स्पर्धा झाल्या तर शिवकालीन युद्धकला महाराष्ट्राचा खेळ म्हणून पुढे येऊ शकेल. 

केरळमध्ये कल्लरीपयटूच्या आखाड्यांतून युद्धकलेचे शास्त्रोक्त प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे केरळ म्हटले, की कलारी असे समीकरण आकाराला आले आहे. तमिळनाडूमध्ये सिलंबम या नावाने लाठी लढतीच्या स्पर्धा होतात. एका सर्कलमध्ये दोन प्रतिस्पर्धी एकमेकाच्या शरीराला लाठीचा स्पर्श करून गुण वसूल करतात. क्रीडा संचालनालयातर्फे महाराष्ट्रात शालेय स्तरावर सिलंबमच्या स्पर्धा घेतल्या जातात. मात्र, त्यात सहभागी स्पर्धकांची संख्या समाधानकारक नाही. महाराष्ट्राचा युद्धकला प्रकार म्हणून शिवकालीन युद्धकलेचे वेड कोल्हापुरात जपले गेले आहे. महाकाली, खंडोबा-वेताळ, नंगीवली, सुबराव गवळी, सणगर-बोडके, धोत्री, जय जवान फेकणे मंडळ, मर्दानी खेळाच्या आखाड्याने ही युद्धकला टिकवून ठेवली. वस्ताद शामराव जाधव, आनंदराव ठोंबरे, बाबासाहेब तिबिले, निवृत्ती पोवार, बाबासाहेब लबेकरी यांनी या कलेचे धडे नव्या पिढीला दिले. मध्यंतरीच्या काळात मोजक्‍याच तालमीत ही युद्धकला जिवंत राहिली. 

गेल्या काही वर्षांत युद्धकलेच्या प्रशिक्षणाचा धडाका सुरू झाला आहे. सह्याद्री प्रतिष्ठान, खंडोबा-वेताळ मर्दानी पथक, नंगीवली तालीम, शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच, युद्धकला विशारद आनंदराव पोवार, शिवगर्जना, हिंदवी, जय जवान फेकणे मंडळ, मर्दानी खेळाचा आखाड्याने या कलेचा जोरदार प्रचार केला. कोल्हापुरातील मध्यवस्तीसह उपनगरांत या कलेचे धडे देण्यात आले. त्याचा प्रसार इतक्‍या वेगाने झाला आहे, की प्रत्येक शिबिरात स्वसंरक्षण म्हटले की लाठी-काठीचा समावेश केला जाऊ लागला आहे. मात्र, या युद्धकलेचे स्वरूप प्रात्यक्षिकात्मक असेच अद्याप आहे. नव्वदच्या दशकांपर्यंत या कलेच्या स्पर्धा होत होत्या. त्यापूर्वी केवळ फरी गदका प्रकारात दोघा प्रतिस्पर्ध्यांत लढत व्हायची. त्याला नियमांची चौकट होती. आता पुन्हा नव्याने युद्धकलेतील प्रकारांना नियमांच्या चौकटीत बांधण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

...तर कलेला प्रोत्साहन 
प्रत्येक तालीम व आखाड्यातील खेळाडूंची शस्त्रं फिरविण्यात विविधता दिसते. नियमांची बांधणी झाल्यास शालेय स्तरावर शिवकालीन युद्धकलेतील काही प्रकारांचा समावेश खेळ म्हणून करता येईल. ज्याद्वारे महाराष्ट्रातील या कलेला आपोआप प्रोत्साहन मिळणार आहे.

Web Title: shivkalin war art golden days