एका दिवसात साकारली शिवपुत्र शंभूराजेंची भव्य मूर्ती

एका दिवसात साकारली शिवपुत्र शंभूराजेंची भव्य मूर्ती

कोल्हापूर - सकाळी सूर्योदयापासून मूर्तीला आकार येऊ लागला... बघता-बघता चेहऱ्यावर एकेक भाव उमटू लागला आणि सूर्यास्तापर्यंत भव्य दहा फुटी शिवपुत्र शंभूराजेंची मूर्ती साकारली गेली. मिरजकर तिकटी येथे मावळा कोल्हापूर संघटनेतर्फे शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला असून, आज हा अनोखा उपक्रम झाला. 

मावळा संघटनेने यंदाच्या उत्सवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांबरोबरच छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचाही जागर मांडला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ही भव्य मूर्ती साकारली गेली. सकाळी शिल्पकार किशोर व पीयूष सुतार यांनी मूर्तिकामाला प्रारंभ केला आणि मिरजकर तिकटी चौकात सर्वांचीच पावलं थबकू लागली. हा अनोखा कलाविष्कार डोळ्यांत साठवूनच प्रत्येक जण पुढे जात होता. दुपारी दोननंतर हळूहळू आणखी गर्दी वाढू लागली. मूर्तीच्या चेहऱ्यावरील एकेक भाव साकारला जाऊ लागला आणि मूर्ती पाहून प्रत्येकाच्या मनात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्यशाली स्मृतींना उजाळा मिळू लागला.  

मूर्तिकामाची छायाचित्रे व व्हिडिओ सोशल मीडियावरून सर्वत्र फिरू लागले. त्यामुळे फारशी उत्सुकता न ताणता पाहता-पाहता मिरजकर तिकटी परिसरात मूर्ती पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. सायंकाळी सातनंतर ‘शिवपुत्र शंभूराजे’ नाट्याविष्कार सजला. या वेळी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील कलाकार उपस्थित होते. 

शिल्पकारांविषयी...
शिल्पकार किशोर सुतार यांचे पुत्र पीयूष म्हणजे सुतार कुटुंबातील पाचवी पिढी. रेणुका मंदिर परिसरातील हे कुटुंब. (कै.) गणपती सुतार यांच्यापासून या कुटुंबात मूर्तिकामाची परंपरा सुरू झाली आणि ती पुढेही कायम राहिली. दळवीज आर्टस्‌ इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी असणारे पीयूषही आता याच क्षेत्रात यशोलौकिकाचा शिलेदार होण्यासाठी सज्ज झाले आहेत.   

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com