कागदाच्या लगद्यापासून साकारले शिवराय

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 July 2020

लॉकडाउनमुळे अनेकांना भरपूर त्रास सहन करावा लागला आहे. पण, काहींनी त्याचा सदुपयोगही केला आहे. शहापूरमधील एक युवकानेही लॉकडाउन सार्थकी लावला आहे. कागदाच्या लगद्यापासून त्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बनविला आहे.

बेळगाव : लॉकडाउनमुळे अनेकांना भरपूर त्रास सहन करावा लागला आहे. पण, काहींनी त्याचा सदुपयोगही केला आहे. शहापूरमधील एक युवकानेही लॉकडाउन सार्थकी लावला आहे. कागदाच्या लगद्यापासून त्याने शिवाजी महाराजांचा पुतळा बनविला आहे. तसेच शिवरायांच्या जीवनावर आधारित चित्रेही रेखाटली आहेत.

Image may contain: 3 people, drawing

द्वारकेश बाडीवाले असे त्याचे नाव असून तो इलेक्‍ट्रिशियनचे काम करतो. लॉकडाउन जाहीर झाल्यापासून जवळपास दोन महिने त्याचे काम बंद होते. त्यामुळे, त्याला घरातच राहावे लागले. वेळ जात नसल्याने त्याने छंद जोपासायला सुरवात केली. छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचे दैवत त्यामुळे त्यांचा एका पुतळा बनविण्याचा निर्णय त्याने घेतला. पण, पुतळा बनविण्यासाठी लागणारा शाडू उपलब्ध नसल्याने त्याने वर्तमानपत्रांच्या कागदाच्या लगद्यापासूनच शिवराय साकारण्याचे ठरविले.

Image may contain: 2 people, drawing

कोणतेही प्राथमिक ज्ञान नसताना केवळ आवडीच्या जोरावर त्याने पुतळा उभारण्यास सुरवात केली. पंधरा दिवस परिश्रम केल्यानंतर प्रत्यक्ष शिवराय अवतरले. हा पुतळा पर्यावरणस्नेही असून त्यासाठी काहीही खर्च आलेला नाही. पुतळ्याचे सिंहासन बनविण्यासाठी त्याने तारांचा वापर केला. बाकी संपूर्ण पुतळा कागदाच्या लगद्यापासूनच तयार झाला आहे. रंगकामही त्याने स्वत:च केले आहे. या शिवाय शिवरायांच्या जीवनावर आधारित अनेक चित्रेही त्याने रेखाटली आहेत. ती सुध्दा आकर्षक झाली आहेत. शिल्पकला व चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान नसतानाही त्याने विकसित केलेली ही कला कौतुकास पात्र आहे.

Image may contain: drawing

छंद जोपासण्याची संधी

मला छत्रपती शिवाजी महाराज फार आवडतात. लॉकडाउनमुळे माझ्याकडे भरपूर वेळ होता. तो चांगल्या कामासाठी वापरण्याचे ठरविले. त्यातूनच लहानपणापासूनचा छंद जोपासण्याची संधी मिळाली. ती मी सत्कारणी लावली.
- द्वारकेश बाडीवाले, शहापूर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivrai made from paper pulp