esakal | शिवसागर जलाशयातील प्रवाशी लॉंच सुरू 
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसागर जलाशयातील प्रवाशी लॉंच सुरू 

कोयना, सोळशी व कांदाटी खोऱ्यातील चार महिन्यांनंतर नागरिकांची प्रतीक्षा संपली; तराफा सेवाही चालू.

शिवसागर जलाशयातील प्रवाशी लॉंच सुरू 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कास : पावसाळ्यात शिवसागर जलाशयाच्या भागातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेली लॉंच वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. परिणामी दुर्गम अशा कांदाटी खोऱ्यातील अनेक गावांना वाहतुकीसाठी एक तर चालत प्रवास करणे अथवा कधीतरी येणाऱ्या गाडीची वाट बघणे एवढेच पर्याय शिल्लक राहिले होते. अखेर ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने कोयना धरण भरले आणि पाऊस कमी झाल्यानंतर चार महिन्यांपासून बंद असलेली शिवसागर जलाशयातील प्रवाशी लॉंच सेवा अखेर सुरू झाली. 
तापोळा येथून दुपारी दोनदरम्यान ही लॉंच कांदाटी खोऱ्याकडे निघते. अधलीमधली गावे घेत बामणोलीत येते. बामणोलीत प्रवाशी घेऊन कांदाटी खोऱ्याची वाट धरते. या विभागातील सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांचे गाव दरे. त्यानंतर आकल्पे, लामज, कांदाटबन, वलवन आदी गावे करत लॉंचचा मुक्काम शिंदी येथे होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता शिंदी येथून निघून वाटेतील थांबे घेत पुन्हा बामणोली, तापोळा असा प्रवास करत अकरा वाजेपर्यंत पोचते. 
कोयना, सोळशी व कांदाटी या तीन विभागांना या लॉंच सेवेचा फायदा मिळतो. जलाशयाचा काठ, तसेच डोंगरावरील सुमारे साठहून अधिक गावांना दळणवळणाचे प्रवासी लॉंच हे एक मुख्य साधन ठरले आहे. बामणोली व तापोळा या बाजारपेठेच्या गावांशी लोकांना शासकीय कामे, बाजार, तसेच शाळा व इतर कामकाजासाठी ये- जा करावी लागते. सातारा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे या प्रवाशी लॉंचची सेवा पुरविली जाते. एप्रिल महिन्यापासून शिवसागर जलाशय कोरडा पडल्याने लॉंच सेवा बंद होती. त्यामुळे मुंबईहून गावाकडे आलेल्या चाकरमान्यांचे खूप हाल झाले होते. अनेकांना तासन्‌तास पायी प्रवास करावा लागला. तद्‌नंतर पावसाळा सुरू झाल्यावर लोकांना अत्यंत बिकट जीवन जगावे लागत होते. या बिकट अवस्थेत पूर्ण संपर्कहीन अवस्थेत दोन महिने या विभागाला राहावे लागले होते. त्यानंतर मात्र पावसाचे प्रमाण कमी झाले, तसेच शिवसागर जलाशय काठोकाठ भरण्याच्या मार्गावर असल्याने ही लॉंच सेवा सुरू केली आहे. या सेवेबरोबरच तापोळा येथे वाहनांना नदीपलीकडे काढण्यासाठी असणारा तराफाही सुरू केला आहे. या लॉंच सेवेचा फायदा आजारी व्यक्ती, शालेय विद्यार्थी व इतर गरजूंना होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

loading image
go to top