युतीचा फायदा कोल्हापुरात शिवसेनेलाच

युतीचा फायदा कोल्हापुरात शिवसेनेलाच

कोल्हापूर -  राज्यात लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीचा जिल्ह्यात सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होणार आहे. या युतीमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. तथापि, विधानसभा लढवायचीच असे ठरवून तयारी केलेल्या माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक सत्यजित कदम यांच्यासह ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव यांची मात्र अडचण होणार आहे. 

कोल्हापुरात महाडिक-मंडलिक लढत
युतीच्या निर्णयावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र अवलंबून होते. लोकसभेचे जिल्ह्यातील दोन्हीही मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहेत. कोल्हापूरमधून प्रा. संजय मंडलिक यांची उमेदवारीही जवळपास निश्‍चित आहे. ऐनवेळी युती झाली नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक यांच्यासमोर भाजपचा पर्याय निवडतील, असा अंदाज होता. कारण काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यासह ‘राष्ट्रवादी’तूनच श्री. महाडिक यांना विरोध हा त्यांच्यादृष्टीने काळजी करण्याचा विषय होता. आता भाजपची रसद प्रा. मंडलिक यांच्या मागे असेल; तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे नेते व प्रमुख कार्यकर्ते श्री. महाडिक यांच्या मागे मनाने आणि ताकदीने उभे राहणार का? हाच त्यांच्यादृष्टीने ‘रिस्क फॅक्‍टर’ आहे. 

आबिटकर, मिणचेकरांना आनंदाच्या उकळ्या
राधानगरी, हातकणंगले या शिवसेनेचे आमदार असलेल्या ठिकाणी भाजपची ताकद नगण्य आहे. या दोन्ही मतदारसंघातही सेनेचे आमदार आहेत. युती झाली नसती, तरी भाजपला उमेदवार शोधावा लागला असता. युतीमुळे विद्यमानांना भाजपची मदत मिळेल. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघाचे विद्यमान आमदार प्रकाश आबिटकर व डॉ. सुजित मिणचेकर यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असतील. 

दक्षिण, इचलकरंतीत विद्यमानांचा मार्ग मोकळा
दक्षिण व इचलकरंजी हे दोन्ही मतदारसंघ भाजपकडे आहेत. त्याठिकाणी या पक्षातच उमेदवारीसाठी स्पर्धा नाही. त्यामुळे या दोन मतदारसंघातील भाजपच्या विद्यमान उमेदवारांमागेच सेनेला रसद उभी करावी लागेल. 

चंदगडमध्ये लढत कुपेकरांच्यातच
चंदगड मतदारसंघ जाणार कोणाकडे, यावर युतीची ताकद कोणाच्या मागे हे ठरेल. ‘राष्ट्रवादी’च्या आमदार संध्यादेवी कुपेकर या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्या विरोधात त्यांचेच पुतणे संग्रामसिंह कुपेकर सेनेचे उमेदवार असण्याची शक्‍यता आहे. या मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थेतील भाजपची ताकद वगळता फारसा प्रभाव नाही.  

शिरोळमध्ये यादव थांबणार?
भाजपने विधानसभेसाठी काहींना पक्षात घेतले आहे. ‘गोकुळ’चे संचालक अनिल यादव हे त्यापैकी एक आहेत. पण, शिरोळमध्ये विद्यमान आमदार उल्हास पाटील हे शिवसेनेचे असल्याने श्री. यादव यांना भाजपकडून संधी मिळणार नाही. 

कागलात संजय घाटगे काय करणार?
विधानसभा लढवायचीच, या उद्देशाने ‘शाहू-कागल’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ही जागा भाजपला जाण्याची शक्‍यता आहे. लोकसभेला दोन्ही घाटगे सेनेचे उमेदवार प्रा. मंडलिक यांना मदत करतील. विधानसभेला त्यांची मदत व्हावी, हा त्या मागचा उद्देश असेल, पण जागाच भाजपला गेली तर संजय घाटगे काय करणार?

उत्तरमधील कटुता संपणार
कोल्हापूर उत्तरमधून पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अलीकडेच भाजपबरोबर असलेले व गेल्या निवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार नगरसेवक सत्यजित कदम या दोघांनीही जय्यत तयारी केली आहे; पण ही जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे आणि आमदार राजेश क्षीरसागर सलग दोन वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. जाधव, कदम यांच्या संभाव्य तयारीवरून श्री. क्षीरसागर यांच्याकडून या दोघांवरही जहरी टीका झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व श्री. क्षीरसागर यांच्यातील कलगीतुराही अधूनमधून रंगला जायचा. यातून निर्माण झालेली कटुता युतीमुळे संपेल का? आणि संपलीच तर एकवेळ श्री. जाधव हे श्री. क्षीरसागर यांना मदत करतील; पण श्री. कदम यांची भूमिका काय? हा महत्त्वाचा प्रश्‍न असेल. 

पन्हाळ्यात कोरे स्वबळावरच
पन्हाळा-शाहूवाडीचे माजी आमदार विनय कोरे यांची अलीकडे भाजपशी सलगी वाढली आहे. त्यातून श्री. कोरे या मतदारसंघाचे भाजप पुरस्कृत उमेदवार असतील, अशी चर्चा होती; पण या मतदारसंघात विद्यमान आमदार सत्यजित पाटील-सरूडकर हे शिवसेनेचे आहेत. विद्यमान आमदार असलेला मतदारसंघ शिवसेना सोडण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे श्री. कोरे यांना पुन्हा आपल्याच ताकदीवर रिंगणात उतरावे लागेल. 

हातकणंगलेत मंत्री खोत यांची अडचण
हातकणंगले लोकसभा मतदारसंघही शिवसेनेकडेच आहे. ‘राष्ट्रवादी’ला रामराम ठोकून शिवसेनेत दाखल झालेले जि. प.चे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने सेनेचे उमेदवार असतील. या मतदारसंघातून भाजपकडून कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना रिंगणात उतरविण्याच्या हालचाली सुरू होत्या. खासदार राजू शेट्टी यांच्याविरोधात शेतकरी नेताच उभा करून ‘काट्याने काटा काढण्याचा’ प्रयत्न भाजपचा होता; पण जागाच भाजपकडे येणार नाही, दुसरा कोण सक्षम उमेदवारही त्यांच्याकडे नाही, अशा परिस्थितीत श्री. खोत काय करणार हे 
महत्त्वाचे आहे. 

विधानसभेचेही संदर्भ बदलणार
जिल्ह्यातील १० पैकी सहा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेला या सहाही जागा भाजपला सोडाव्या लागतील. या सहापैकी किमान चार जागांवर भाजपचीच अडचण होणार आहे.

दृष्टिक्षेपात राजकीय स्थिती
२००९ (शिवसेना-भाजप युती होती)
  लोकसभा- जागा २
१ अपक्ष (कै. सदाशिवराव मंडलिक), राजू शेट्टी- स्वाभिमानी
  विधानसभा- जागा १०
काँग्रेस- २, राष्ट्रवादी- ३, शिवसेना- ३, भाजप- १, जनसुराज्य- १

२०१४ (युती नसताना) 
 लोकसभा- जागा २
 धनंजय महाडिक- राष्ट्रवादी. राजू शेट्टी- स्वाभिमानी
 विधानसभा- जागा १
 शिवसेना- ६, भाजप- २, राष्ट्रवादी- २, काँग्रेस- ०प्रतिक्रिया

युतीच्या निर्णयाची आम्ही वाट पाहत होतो. हा निर्णय चांगला आहे. या निर्णयाची जिल्ह्यातील भाजप-शिवसेनेची नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने काम करतील. शिवसेनेची सहा विधानसभा मतदारसंघात मोठी ताकद आहे. आता भाजपचेही बळ मिळेल. गेल्या निवडणुकीत युतीमार्फतच मी लढलो होतो. निसटत्या पराभवानंतरही आपण राजकारणात तसेच सार्वजनिक जीवनात सक्रिय होतो. युतीमुळे मतांची विभागणी होणार नाही.
-प्रा. संजय मंडलिक, सह संपर्कप्रमुख शिवसेना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दुसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या निर्णयामुळे गेल्यावेळी पेक्षा युतीच्या जादा जागा येतील. इतकेच नव्हे तर देशात जागांची काही घट झाली, तर ती महाराष्ट्र भरून काढेल. दोन्ही पक्षांचे नेते जागा निवडून आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.
- बाबा देसाई, भाजप ज्येष्ठ नेते

पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आपल्यात काही मुद्द्यांवर तात्विक वाद होते. महापालिकेतील सत्तेसंबंधी जो आदेश येईल, तो पाळला जाईल. पक्ष आदेश देईल, त्याप्रमाणे महापालिकेच्या राजकारणात पाळला जाईल. आजच केएमटीला शिवसेनेचा सभापती झाला. लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत ताकदीने काम करू.
-आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेना.

युतीचा निर्णय चांगलाच आहे आणि राज्यात युतीचेच सरकार पुन्हा यावे, हीच सर्वांची भावना आहे. कोल्हापूरचा खासदार शिवसेनेचा व्हावा, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न असून, ते सत्यात उतरवण्यासाठी आम्ही सारे मिळून ताकदीनिशी प्रयत्न करणार आहे. 
- संजय पवार, 
उपाध्यक्ष, अण्णासाहेब पाटील महामंडळ

केंद्र तसेच राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार यावे, हीच जनतेच्या मनातील इच्छा आहे. त्या दृष्टीने युतीचा निर्णय झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाप्रमाणे भाजपचे कार्यकर्ते काम करतील. 
-महेश जाधव, 
अध्यक्ष पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती

युतीचा निर्णय आनंददायक आहे. भाजप -शिवसेनेची युतीच लोकांना हवी आहे. ‘मातोश्री’ वरून जसे आदेश येतील त्या प्रमाणे कार्यवाही केली जाईल.
-विजय देवणे, जिल्हाप्रमुख शिवसेना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com