शिवसेना भाजपचा पाठिंबा काढणार नाही - कीर्तीकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 18 जून 2018

सांगली - राज्यातील भाजपचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. शिवसेना पाठिंबा काढून घेणार नाही; मात्र, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढेल. भाजपने आतापर्यंत शिवसेनेला दिलेली वागणूक पाहता त्यांच्याशी युती कदापी होणार नाही, अशी भूमिका खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

सांगली - राज्यातील भाजपचे सरकार पाच वर्षे पूर्ण करेल. शिवसेना पाठिंबा काढून घेणार नाही; मात्र, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावरच लढेल. भाजपने आतापर्यंत शिवसेनेला दिलेली वागणूक पाहता त्यांच्याशी युती कदापी होणार नाही, अशी भूमिका खासदार गजानन कीर्तीकर यांनी आज पत्रकार परिषदेत मांडली.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर झालेल्या मेळाव्यासाठी कीर्तीकर आले होते. ते म्हणाले, 'शिवेसना भाजपसोबत सांगलीत काय, देशात कुठेच युती करणार नाही. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत तशी घोषणा केली आहे. अगदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भेटून गेल्यानंतरही भूमिका पुन्हा स्पष्ट केली. लोकसभा, विधानसभा स्वतंत्रच लढू. भाजपने शिवसेनेचा सन्मान केला नाही.

आम्ही युती शासनात गोपीनाथ मुंडेंना उपमुख्यमंत्रिपद दिले. भाजपने मात्र शिवसेनेच्या ताकदीप्रमाणे स्थान दिले नाही. केंद्रात 21 जागा असताना दोन कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद मिळायला हवे होते. 34 राष्ट्रीयकृत बॅंकांवर त्यांनी संचालक नेमले. त्यातही शिवसेनेला स्थान नाही. महामंडळावरील नियुक्‍त्या परस्पर केल्या जात आहेत. त्यांचे चालू द्या, आम्ही दीर्घ लढाईला तयार आहोत; परंतु पाठिंबा काढून घेणार नाही. अर्थात, शिवसेना फुटेल अशा चर्चांना अर्थ नाही. तसे होणार नाही. आम्ही काही धोरणात्मक निर्णय घेऊन भाजपला पाठिंबा दिलाय, तो पाच वर्षांसाठी राहील. त्याआधी सरकार पडणार नाही.''

ते म्हणाले, 'महाराष्ट्रात शिवसेना भक्कम आहे. तळागाळात मुळे रुजलीत. त्यामुळे स्वतंत्रपणे लढून राज्यात सत्ता मिळवू, हाच निर्धार आहे.''

मोदी हटाव, हा आमचा नारा नाही
श्री. कीर्तीकर म्हणाले, 'मोदी हटाव, हा आमचा नारा नाही. राज्याच्या हितासाठी शिवसेनाच हवी, हे लोकांना आता पटले आहे. लोकच आमच्या पाठीशी ठाम उभे राहतील. भाजप विरुद्ध अन्य सर्व, असे चित्र असले तरी शिवसेना स्वःबळावर उभी असेल.''

Web Title: Shivsena BJP Support Gajanan Kirtikar Politics