सेनेला संपविणारेच संपले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

मेळाव्यात भाजपवर नेम; आयारामांना घेऊन पक्ष वाढत नाही

मेळाव्यात भाजपवर नेम; आयारामांना घेऊन पक्ष वाढत नाही

कोल्हापूर - शिवसेनेचा आधार घेत आज सत्तेवर आलेल्या मंडळींना सत्तेची मस्ती आली आहे. त्यामुळे त्यांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा सुरू केली आहे. आतापर्यंत अनेकांनी शिवसेनेला संपविण्याची भाषा केली, पण शिवसेना संपली नाही, उलट संपविणारेच संपले. सत्तेवर आल्यामुळे त्यांना थोडी सूज आली आहे; पण गोळी दिल्यानंतर ती उतरेल. त्यांना घाबरण्याचे काही कारण नाही. लोकांची कामे करत राहा, लोक तुमच्याच बाजूने उभे राहतील. आयाराम, गयारामांना घेऊन पक्ष वाढत नसतो, असा टोला शिवसेनेच्या मेळाव्यात आज भाजपला लगावण्यात आला.

कोल्हापूर शहर शिवसेनेचा वर्धापन दिन आज उत्साहात साजरा झाला. यानिमित्ताने केशवराव भोसले नाट्यगृहात ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार आणि मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील व शिवचरित्र व्याख्याते शिवरत्न शेटे यांच्या तोफा चांगल्याच धडाडल्या. भाजपसह काँग्रेस व राष्ट्रवादीचा त्यांनी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

मंत्री पाटील म्हणाले, ‘‘अन्याय होत असलेल्या ठिकाणी धावून जाणारी संघटना म्हणून शिवसेनेचा लौकीक आहे. त्यामुळे लोक प्रश्‍न घेऊन आपल्याकडे येत असतात. ते सोडविण्यासाठी शिवसेनेचा शाखाप्रमुख आणि त्या शाखेचा कार्यकर्ता सक्षम असला पाहिजे. पैशाच्या जोरावर निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्ष करत आहेत. या परिस्थितीत कार्यकर्त्यांनी शाखा बळकट करण्याकडे लक्ष द्यावे. शाखा बळकट केल्यास कोणतीही लाट येऊ दे, काही फरक पडत नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे. मतदान न करणाऱ्या लोकांच्या सर्व सुविधा बंद कराव्यात, अशी मागणी आहे. तसे केल्याशिवाय मतदानाची टक्‍केवारी वाढणार नाही; पण हे कोणाला करावयाचे नाही. कारण पैशाच्या जोरावर त्यांना निवडणुका जिंकायच्या आहेत. शिवसेना मुस्लिमांच्या विरोधात आहे, असे त्यांना आजपर्यंत सांगण्यात आले, पण शिवसेनेत मुस्लिमांची संख्या वाढत आहे.  

श्री. शेटे म्हणाले, ‘‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी बोटाला धरून महाराष्ट्रात ज्यांना उभा केले तीच मंडळी आज सत्तेवर आल्यावर शिवसेनेलाच संपविण्याची भाषा करू लागली आहेत. काँग्रेसवाल्यांनी जेवढा त्रास दिला नाही, तेवढा त्रास ही मंडळी देत आहेत. भगवा चिरडण्याचा प्रयत्न करू लागले आहेत, पण दिल्लीहून आलेल्या औरंगजेबाच्या फौजेची जशी अवस्था छत्रपती शिवरायांनी केली होती, तशीच अवस्था त्यांची होणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून सावध राहावे.’’  

आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, ‘‘पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात दोन खासदार आणि दहा आमदार निवडून आणण्याची भाषा केली; पण आजपर्यंतचा इतिहास पाहिला तर शिवसेना नेहमीच शहरात निवडून आली आहे. केवळ एकदा लोकांनी छत्रपती घराण्याला मान दिल्याने शिवसेनेचा उमेदवार पराभूत झाला होता. कार्यकर्त्यांच्या जोरावर आपण हॅट्ट्रिक करणार आहे. यापुढील काळात शहरात शाखा वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील.’’ या वेळी दीपक गौड, उदय पोवार, वैशाली राजशेखर यांची भाषणे झाली. शाहीर आझाद नायकवडी यांच्या पोवाड्याने कार्यक्रमास सुरवात झाली. त्यानंतर पाच वर्षाच्या रिहाण नदाफ याचे छत्रपती शिवरायांवर भाषण झाले. कार्यक्रमास परिवहन समिती सभापती नियाज खान, नगरसेवक राहुल चव्हाण, प्रज्ञा उत्तुरे, महिला शहरप्रमुख मंगल साळोखे, किशोर घाटगे, ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंत भालकर आदी उपस्थित होते. पद्माकर कापसे यांनी सूत्रसंचालन केले.

राणे संपले, पण कोकणात सेनाच
शिवसेनेतून प्रथम छगन भुजबळ बाहेर पडले. त्यांच्यासोबत आणखी काही आमदार गेले. नंतर नारायण राणे गेले. अलीकडे राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले. आज या सर्वांची काय अवस्था आहे. भुजबळांबद्दल बोलू नये, पण आज ते आसाराम बापूसारखे दिसत आहेत. भेटावयास आलेल्या कार्यकर्त्यांपेक्षा कुत्र्यातच रमणारे राज ठाकरे आज कुठे आहेत? शिवसेना सोडल्यामुळे कोकणातील शिवसेना संपली, असे नारायण राणे यांना वाटत होते; पण त्यांना वैभव नाईक यांच्याकडे हात करत या पट्टयाने गेल्या निवडणुकीत पाणी पाजले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे मंत्री पाटील म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

गद्दारी करू नका
जिल्ह्यात सहा आमदार शिवसेनेचे आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह सर्वांना तेवढे आमदार पुरे आहेत. पुढे लोटके धरण्याचे काम आमदार राजेश क्षीरसागर करतील. बाकीचे चार खांदेकरी आहेत, असे सांगून मंत्री पाटील म्हणाले, ‘‘सत्तेची मस्ती आल्यामुळे काही आमिषे घेऊन लोक तुमच्यापर्यंत येतील, पण बळी पडू नका. बाप बदलू नका. गद्दारी केलेल्या कोणाचेही चांगले झालेले नाही. यापूर्वी काही जणांनी गद्दारी केली, पण त्यांची अवस्था वाईट झाली. तेव्हा लोकांची कामे करत राहा.’’

सायकलचोराला बनविले मुख्यमंत्री
शिवसेनेने सर्वसामान्यांना पदे दिली. मी पान टपरीवाला, नशीब पान शॉप असे टपरीचे नाव होते. छगन भुजबळ भाजी विक्रेते. त्यांच्याबरोबर शिवसेना सोडलेले आमच्याकडील आमदार रस्त्यावरील विक्रेते. एवढेच काय सायकलचोर नारायण राणे यांना तर शिवसेनेने मुख्यमंत्री केले. अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. सामान्य कार्यकर्त्याला शिवसेनेने सन्मान मिळवून दिला. मला कोण विचारत होते? पण आज पुढे पोलिस गाडी, मागे गाडी आणि मध्ये गुलाब गडी आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगताच सभागृहात हशा पिकला.

Web Title: shivsena campaign in kolhapur