'आयुक्तच नव्हे, सारे नगरसेवकही भ्रष्ट'

विजयकुमार सोनवणे
शनिवार, 12 मे 2018

परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार जाणीवपूर्वक अडविणाऱ्याला गरीबांची हाय लागेल. कर्मचारी माणसं नाहीत का. 600 कुटुंबियांची हाय (शाप) लागल्यानेच सोलापूरचा विकास थंडावला आहे. आपली पदे आणि अधिकारांचा वापर करून लोकहिताची कामे करा, शहर आपोआप सुधारेल.
- अनुराधा काटकर, नगरसेविका काँग्रेस
 

सोलापूर : केवळ आयुक्तच नव्हे तर माझ्यासह सर्व पदाधिकारी व नगरसेवकही भ्रष्ट आहेत, असे म्हणत शिवसेनेचे नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांनी महापालिकेच्या कारभारात सुरु असलेली बजबजपुरी उघडकीस आणली.

महापालिका सभा सुरु होण्यापूर्वी कांग्रेस व बसपच्या नगरसेवकांनी परिवहन विभागातील आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांची भेट घेतली. दहा महिन्यांपासून पगार नसलेल्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनावेळी आयुक्तांच्या नावाने हालगीनाद केला, बोंबाबोंब आंदोलन केले. काही कामगारांनी भ्रष्ट आयुक्त हटाअो परिवहन बचाअो असा उल्लेख असलेले जॅकेट घातले होते. अशा पद्धतीचे जॅकेट घालून कांग्रेसचे नगरसेवक चेतन नरोटे, रियाज हुंडेकरी, बसपाचे आनंद चंदनशिवे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, स्वाती आवळे सभागृहात आले.

सभा सुरु झाल्यावर आयुक्त अविनाश ढाकणे यांचे लक्ष हुंडेकरी यांनी घातलेल्या जॅकेटवर गेले. त्यावरील उल्लेख पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. महापालिकेच्या सभेत एखादा नगरसेवक भ्रष्ट आयुक्त लिहलेले जॅकेट घालून आला असेल तर, ते माझ्या दृष्टीने अवमानकार आहे. ते जॅकेट काढून टाकावे किंवा मला कायदेशीर कारवाई करावी लागेल, असा इशारा दिला. ते एकल्यावर काँग्रेसचे चेतन नरोटे व रियाज हुंडेकरी चिडले. त्यांनी, आमच्यावर गु्न्हे दाखल करा. लोकशाहीत आंदोलनाचा अधिकार आहे. त्यानुसार अशी आंदोलने होणारच, असे आव्हान आयुक्ताना दिले. त्यावेळी, लोकशाही आहे तर आरोप सिद्ध करा, असे सांगितले. त्यावरून पुन्हा गोंधळ सुरु झाला. तुम्ही भ्रष्ट नसाल तर तुम्हाला राग येण्याचे काहीच कारण नाही, असा टोला काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी हाणला. तर, आयुक्तांनी आपली हुकुमशाही सभागृहात चालवू नये, असे बसपचे आनंद चंदनशिवे म्हणाले. गोंधळ वाढत चालल्याचे पाहून ज्येष्ठ नगरसेवक यू. एन. बेरिया यांनी हस्तक्षेप केला आणि जॅकेट उतरविण्यास सांगितले. त्यानंतर गोंधळ थांबला.

या घडामोडीवर भाष्य करताना श्री. गुत्तरगावकर म्हणाले, केवळ आयुक्तच नाही, तर माझ्यासह आपण सर्व नगरसेवकही भ्रष्ट आहोत. दिलेला शब्द न पाळणे, त्यानुसार आचरण न करणे म्हणजे एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. नगरसेवकांनी आम्हाला त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सभागृहात पाठविले आहे. निवडणुकीच्या पूर्वी दिलेली आश्वासने आपणाला पाळता येत नसेल तर तो एकप्रकारचा भ्रष्टाचारच आहे, असे श्री. धुत्तरगावकर म्हणाले.

परिवहन कर्मचाऱ्यांचा पगार जाणीवपूर्वक अडविणाऱ्याला गरीबांची हाय लागेल. कर्मचारी माणसं नाहीत का. 600 कुटुंबियांची हाय (शाप) लागल्यानेच सोलापूरचा विकास थंडावला आहे. आपली पदे आणि अधिकारांचा वापर करून लोकहिताची कामे करा, शहर आपोआप सुधारेल.
- अनुराधा काटकर, नगरसेविका काँग्रेस
 

Web Title: Shivsena corporater blame in Solapur Municipal Corporation