80 लाख रूपये घेणाऱ्या गद्दारांची शिवसेनेतून हकालपट्टी करावी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कोल्हापूर - लोकसभा निवडणूकीत 80 लाख रूपये घेणाऱ्या प्रवृत्तीचा शोध घेऊन शिवसेनेतून अशा गद्दारांची हकालपट्टी करावी,  अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी केली. 

कोल्हापूर - लोकसभा निवडणुकीत ऐंशी लाख रूपये घेणाऱ्या प्रवृत्तीचा शोध खासदार संजय मंडलिक तसेच संपर्कप्रमुखांनी घ्यावा. अशा गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज केली.

शिवसेना पदाधिकारी मेळावा तसेच सदस्य नोंदणीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रंकाळा बसस्थानकालगतच्या करवीर निवासिनी मंगल कार्यालयात हा मेळावा झाला. 

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला जिल्ह्यातील जनतेने दोन्ही खासदार निवडून देऊनही पक्षातंर्गत गटबाजी काही कमी झाली नसल्याचे श्री. पवार यांच्या आजच्या विधानावरून स्पष्ट झाले. निकाल लागून दोन महिने उलटल्यानंतर आता पैसे कुणी घेतले याची चर्चा सुरू झाली आहे. 

श्री. पवार म्हणाले, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी पैसा आणि स्वार्थ बधणारी काही मंडळी होती. अशा प्रवृत्तीने ऐंशी लाख रूपये घेतल्याचा संशय आहे. त्याचे रिपोर्टींगही झाले आहे. इतरांनी काही हालचाली केल्या तर त्यांचा अहवाल तातडीने पक्षनेतृत्वाकडे जातो. या प्रकरणीही विचारणा व्हावी. विशिष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आपला लढा आहे. स्वार्थ आणि पैसा पाहणारी प्रवृत्ती लोकसभा निवडणुकीत पाहावयास मिळाली. निवडणुकीच्या जोरावर कुणाचे घर चालत नाही. प्रचार प्रामाणिकपणे कोण करतो कोण नाही, यासाठी त्रयस्थ यंत्रणा कार्यरत होती. या यंत्रणेने तसेच खासदार मंडलिक यांनी प्रवृत्तीचा शोध घेऊन गद्दारांची हकालपट्टी करावी.

जास्तीत जास्त शिवसेना सभासद नोंदणीसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. कोल्हापुरात शिवसेनेचे संघटन कौशल्य चांगले आहे. काँग्रेस राष्ट्रवादी शिल्लकच राहणार नाही यासाठी प्रयत्न करावेत. 

-  विजय देवणे, जिल्हाप्रमुख

दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शिवाजी जाधव, माजी आमदार सुरेश साळोखे, शुभांगी पवार, मंजित माने आदी यावेळी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivsena District president Sanjay Pawar comment