Vidhan Sabha 2019 : शिवसेनेत बहुजनांवर अन्याय; माजी मंत्री खंदारेंचे पक्षप्रमुखांना पत्र

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेत बहुजनांवर अन्याय; माजी मंत्री खंदारेंचे पक्षप्रमुखांना पत्र

सोलापूर : शिवसेनेत बहुजन नेते, शिवसैनिकांवर अन्याय होत आहे. संपर्कप्रमुख तानाजी सावंत यांच्याकडून बहुजन शिवसैनिकांना हेरून खड्यासारखे बाजूला सारण्याचा मनमानी सपाटा चालू आहे, असे आरोप माजी मंत्री, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उत्तमप्रकाश खंदारे यांनी केले आहेत. याबाबतच्या तक्रारीचे पत्र खंदारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्वव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठविले आहे. 

खंदारे आपल्या पत्रात म्हणतात, "मी 1989 पासून निष्ठावंत शिवसैनिक आहे. 1995, 1999 आणि 2004 सलग तीन विधानसभेच्या निवडणुका जिंकून हॅट्‌ट्रीक केली होती. 2009 आणि 2014 साली आपल्याच पक्षाच्या प्रकाश वानकर, पुरुषोत्तम बरडे, दीपक गायकवाड, काका देशमुख, साईनाथ अभंगराव, बाळासाहेब देशमुख, प्रताप चव्हाण, हरि चौगुले व अन्य पुढाऱ्यांनी फंदफितुरी केल्याने मी हरलो, पण भगवा निष्ठेने हाती घेऊन ठाम राहिलो. कधीही तक्रार केली नाही. प्रा. तानाजी सावंत जिल्ह्याचे संपर्कप्रमुख झाले. त्यांनी माझी निष्ठा, ज्येष्ठता जाणून-बुजून पायदळी तुडवायला सुरवात केली आहे. कारण, मी मागासवर्गीय आहे, मराठा नाही म्हणूनच. मला पक्ष संघटनेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र त्यांनी केले आहे.' 

निष्ठावंत शिवसैनिक असलेल्या धनंजय डिकोळे, भाऊसाहेब आंधळकर, रतिकांत पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाचाही खंदारे यांनी आपल्या पत्रात उल्लेख केला आहे. 

पद्मशाली असल्याने महेश कोठेंवर अन्याय

जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार असलेल्या नारायण पाटील हे बहुजन धनगर समाजाचे आहेत म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला आहे. 2014 ला महेश कोठे शिवसेनेत आले. विधानसभा उमेदवार झाले, जिल्हाप्रमुख झाले. आता ते "शहर मध्य'मधून संभाव्य उमेदवार म्हणून कामाला लागले होते, पण कोठेही बहुजन पद्मशाली समाजाचे असल्याने तानाजी सावंत यांनी त्यांच्यावर अन्याय केला. त्यांनी दिलीप माने यांना पुढे केले. पक्षप्रमुखांनी जातीयवादी घडामोडीकडे गांभीर्याने पाहावे. शिवसेनाप्रमुखांच्या बहुजनांची शिवसेना एकसंघ ठेवण्यासाठी कठोर कारवाई करावी, असे खंदारे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com