सोलापूरच्या शिवसैनिकाची आरजे मलिष्काला धमकी! 

परशुराम कोकणे
गुरुवार, 19 जुलै 2018

आरजे मलिष्काने मुंबईबद्दल काहीही बोलले तर आम्ही शिवसैनिक सहन करू शकत नाही. ज्या मुंबईत तुम्ही राहता त्याच मुंबईबद्दल अशी बदनामी करू नये. खड्डे तर सगळीकडेच आहेत. आपल्या शहराबद्दल प्रेम पाहिजे. खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे शासनाचे, महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी दुसरं काही तरी करा. मुंबईत खड्ड्यात गेली असे म्हणणे चुकीचे आहे. गाणे ऐकल्यानंतर मी रेड एफएमच्या कार्यालयात फोन करून माझा राग व्यक्त केला आहे. 
- अतुल भवर, शिवसैनिक, सोलापूर

सोलापूर : मुंबईतील खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्यासाठी रेड एफ एमच्या आरजे मलिष्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी "झिंग झिंग झिंगाट..'च्या तालावर बनविलेले "गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणे चांगलेच व्हायरल होत आहे. या गाण्यातून मुंबईची बदनामी होत असल्याचा आक्षेप घेऊन सोलापूरचे शिवसैनिक अतुल भवर यांनी कार्यालयात घुसून मलिष्काला मारण्याची धमकी दिली आहे. 

कडवे शिवसैनिक असलेले अतुल भवर हे सोलापुरातील शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रावण भवर यांचे चिरंजीव आणि युवा सेनेचे पदाधिकारी बाबासाहेब भवर यांचे भाऊ आहेत. शिवसेना आणि बाळासाहेबांविषयी ते नेहमीच सोशल मीडीयावर सकारात्मक लिखाण करत असतात. लिखाणातील कडव्या शब्दांमुळे राज्यभर त्यांचा फॅन फॉलोवर आहे. "गेली गेली मुंबई खड्ड्यात..' हे गाणं ऐकल्यानंतर अतुल भवर यांनी मुंबईतील रेड एफएमच्या कार्यालयात फोन केला. मुंबईची बदनामी करणारे गाणं करणं योग्य आहे का? असा सवाल अतुल भवर यांनी केला आहे.

"मुंबईची बदनामी करण्याचा ठेका तुम्ही उचलाय का?, मी सोलापुरात राहत असलो तरी महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईविषयी नितांत आदर आहे. राजधानीला जर कोणी नाव ठेवत असेल तर बाळासाहेबांचा शिवसैनिक शांत बसणार नाही. मुंबईमध्ये 105 जणांनी हौतात्म्य पत्करले आहे. यापुढे जर मलिष्का यांनी अशी गाणी केली तर शिवसेनेकडून त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. शिवसेनेच्या रणरागिणी रेड एफएमच्या कार्यालयात घुसून मारतील. शिवसेना आमचा पक्ष आहे, मराठी आमची अस्मिता आहे आणि मुंबई आमची शान आहे.. जय महाराष्ट्र..' असा संवाद त्यांनी साधला आहे. रेड एफएम कार्यालयात अतुल भवर यांनी केलेल्या कॉलची ऑडिओ क्‍लिप सर्वत्र व्हायरल होत आहे. 

आरजे मलिष्काने मुंबईबद्दल काहीही बोलले तर आम्ही शिवसैनिक सहन करू शकत नाही. ज्या मुंबईत तुम्ही राहता त्याच मुंबईबद्दल अशी बदनामी करू नये. खड्डे तर सगळीकडेच आहेत. आपल्या शहराबद्दल प्रेम पाहिजे. खड्ड्यांच्या प्रश्‍नाकडे शासनाचे, महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी दुसरं काही तरी करा. मुंबई खड्ड्यात गेली असे म्हणणे चुकीचे आहे. गाणे ऐकल्यानंतर मी रेड एफएमच्या कार्यालयात फोन करून माझा राग व्यक्त केला आहे. 
- अतुल भवर, शिवसैनिक, सोलापूर

Web Title: ShivSena member warn RJ Malishka for Mumbai potholes