अखेर सावंत सेनेला "मातोश्री'चा दणका; निष्ठावंतांकडे जबाबदारी 

परशुराम कोकणे
Sunday, 12 January 2020

संपर्कप्रमुख तानाजी सावंत, त्यांचे बंधू समन्वयक शिवाजी सावंत यांच्याबाबतची नाराजी थेट मातोश्रीवर पोचल्याने सावंत सेनेला दणका बसल्याचे बोलले जात आहे. 

सोलापूर : गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या घडामोडींनंतर शिवसेनेत बदल दिसून येत आहेत. प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांना संधी दिल्यानंतर शहरप्रमुखपदाची जबाबदारी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर यांच्याकडे देण्यात आली आहे. संपर्कप्रमुख तानाजी सावंत, त्यांचे बंधू समन्वयक शिवाजी सावंत यांच्याबाबतची नाराजी थेट मातोश्रीवर पोचल्याने सावंत सेनेला दणका बसल्याचे बोलले जात आहे. 

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

सावंत यांच्यामुळे नाराजी
शनिवारी जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते मातोश्रीवर बराच वेळ होते. सर्वांनी सावंत यांच्यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये असलेली नाराजी पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर बोलून दाखविली. सोलापुरातील शिवसेनेची सावंत सेना कशी झाली आहे याची माहिती पक्षश्रेष्ठींना देण्यात आली. त्यानंतर पक्षप्रमुखांनी सर्वांशी सकारात्मक संवाद साधला. 

हेही वाचा - माहिती आहे का? 'मिडल ईस्ट'ला जाताहेत सोलापूरचे मासे!

ठोंगे-पाटील यांची पक्षातून हकालपट्टी
सोलापूरचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, सोलापूरचे शहरप्रमुख हरिभाऊ चौगुले, पंढरपूर विभागाचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, मोहोळ तालुका प्रमुख चरणराज चवरे यांच्याकडील जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ठोंगे-पाटील यांची तर पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. माजी आमदार नारायण पाटील यांना मोठ्या पदावर संधी मिळण्याची शक्‍यता आहे. ज्येष्ठ नेते पुरुषोत्तम बरडे यांच्याकडे पुन्हा एकदा प्रभारी जिल्हाप्रमुखपद देण्यात आले आहेत. 

हेही वाचा -  सुरक्षा रक्षकाने मुलीला दाखवले खाऊचे आमिष! अन्‌..

 

Image may contain: 5 people, including Santosh Vhatkar, people smiling, people standing and beard
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर

हे आहेत नवीन पदाधिकारी 
प्रभारी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे (सोलापूर शहर, सोलापूर दक्षिण आणि अक्कलकोटची जबाबदारी), धनंजय डिकोळे (पंढरपूर), सोलापूर शहरप्रमुख गुरूशांत धुत्तरगावकर, मोहोळ तालुकाप्रमुख अशोक भोसले. 

संपर्कप्रमुख, समन्वयक बदलणार? 
शिवसेना संपर्कप्रमुख तानाजी सावंत आणि त्यांचे बंधू समन्वयक शिवाजी सावंत यांनी गेल्या दोन-तीन वर्षात सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेना आपल्या ताब्यात ठेवली होती. जिल्ह्यातील आधीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत त्यांचा सहभाग होता. मंत्री पदावर संधी न मिळाल्याने समर्थकांच्या माध्यमातून तानाजी सावंत यांनी केलेली धडपड, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत सावंत बंधूंनी भारतीय जनता पार्टीला केलेली मदत महागात पडली आहे. मातोश्रीवरून जिल्ह्यातील आधीच्या पदाधिकाऱ्यांना दणका देण्यात आला आहे. या पार्श्‍वभूमीवर सावंत बंधूंची पदे धोक्‍यात आल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा - अन्‌ वकिलाने वाढदिवसाला घेतलेली सायकल काढली बाहेर!

दिलीप माने झाले गायब 
शिवसेनेत संपर्कप्रमुखांबद्दल नाराजीचे वादळ सुरू असताना सावंत यांच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेत आलेले माजी आमदार दिलीप माने हे सध्या गायब झाले आहेत. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा असली तरी त्यांच्याविषयी शिवसेनेचे नेते सकारात्मक नसल्याचे बोलले जात आहे. 

सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्यात शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी आम्ही काम करू. नारायण पाटील, महेश कोठे यांना महत्त्वाचे पदे मिळू शकतात. गुरुशांत धुत्तरगावकर हे कडवट शिवसैनिक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ते शिवसेना वाढीसाठी कार्यरत आहेत. त्यांना पक्षाने मोठी संधी दिली आहे. 
- पुरुषोत्तम बरडे, 
प्रभारी जिल्हाप्रमुख


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ShivSena Padadhikari appointed