शिवसेनेचे पालिकांत हसू... झेडपीत गोंधळ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

सातारा - एकेकाळी पक्षाचा खासदार, आमदार असणाऱ्या सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस शिवसेनेची वाताहात होत आहे. राज्यात सत्ता आल्याने पुन्हा शिवसेनेला ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा निष्ठावंतांना होती. मात्र, कार्यकर्त्यांना बळ मिळत नसल्याने शिवसेनेची बिकट अवस्था कायम आहे.

पालिका, नगरपंचायतींत अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागल्याने शिवसेनेचे हसू झाले. आता जिल्हा परिषद निवडणुकीत एकजूट, बळ मिळत नसल्याने जिल्हा शिवसेनेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सातारा - एकेकाळी पक्षाचा खासदार, आमदार असणाऱ्या सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस शिवसेनेची वाताहात होत आहे. राज्यात सत्ता आल्याने पुन्हा शिवसेनेला ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा निष्ठावंतांना होती. मात्र, कार्यकर्त्यांना बळ मिळत नसल्याने शिवसेनेची बिकट अवस्था कायम आहे.

पालिका, नगरपंचायतींत अवघ्या ११ जागांवर समाधान मानावे लागल्याने शिवसेनेचे हसू झाले. आता जिल्हा परिषद निवडणुकीत एकजूट, बळ मिळत नसल्याने जिल्हा शिवसेनेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांचे धुमशान सुरू झाले असून, फेब्रुवारी, मार्चमध्ये निवडणूक लागण्याची दाट शक्‍यता आहे. जिल्ह्यात राजकीय वर्चस्व असलेल्या राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी आपापल्या मतदारसंघांतील गटात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांच्या भेटीगाठी सुरू असून, मतदारांचा संपर्क वाढविणे, कार्यकर्त्यांना बळ देणे आदी बाबींवर लक्ष केंद्रित केले आहे. जिल्हा परिषदेत भक्‍कम स्थान मिळविण्यासाठी काँग्रेसही एकसंधपणे कामाला लागली आहे. नेतेमंडळींनी इच्छुकांची चाचपणी सुरू ठेवली आहे. भारतीय जनता पक्षाला सातारा पालिकेत सहा, वाईत दोन, कऱ्हाडमध्ये चार, मेढा व पाटण येथे प्रत्येकी एक, वडूजला तीन अशा एकूण १८ जागांवर यश मिळाल्याने जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणूक ताकदीने लढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची ‘पद, प्रतिष्ठा, पैसा’ या त्रिसूत्रीची ताकद लाभत आहे. 

शिवाय, कऱ्हाड, वाई पालिकेत भाजपचा नगराध्यक्ष असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वरिष्ठ नेत्यांचेही साताऱ्यावर लक्ष राहाणार आहे. त्याच ताकदीनेही भाजपने आगेकूच केली आहे. 

शिवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद ताकदीने लढविण्याचा निर्धार केला आहे; परंतु गत पालिका निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर ताकद मिळत नसल्याने अनेकांनी पक्ष सोडत आघाडी, भाजपमधून उमेदवारी घेणे पसंत केले होते. त्याचा फटका जिल्ह्यातील पालिका, नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिवसेनेला बसला आहे.

रहिमपूरला एक, महाबळेश्‍वरला पाच, मेढा येथे तीन, पाटण येथे दोन अशा अवघ्या ११ जागांवर यश मिळाले. पालकमंत्री विजय शिवतारे यांनी मेढा, रहिमतपूर, कऱ्हाड, महाबळेश्‍वर येथे सभा घेतल्या; परंतु या निवडणुकीत बळ न मिळाल्यानेच अपयशाला सामोरे जावे लागल्याची खंत शिवसैनिक व्यक्‍त करत आहेत. तशी टीकाही सातारा तालुक्‍यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत झाली होती. त्यामुळे सेनेची पालिका निवडणुकीतल परिस्थिती सुधारणार का पुन्हा तेच, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

राजीनामा सत्र होणार?
पालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीत काहींनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला, तर प्रवेशाच्या वाटेवर असणाऱ्यांना ‘रामराम’ ठोकला. आता आगामी निवडणुकांतही बळ मिळण्याची चिन्हे दिसत नसल्याने सहा ते आठ पदाधिकारी राजीनामा देण्याच्या विचारात आहेत. पालकमंत्री २१ रोजी बैठक घेणार असून, त्यात निर्णय न झाल्यास पदाधिकारी राजीनामे देतील, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली. 

बळ देण्यासारखे तरी हवेत
पदाधिकारी, कार्यकर्ते पालकमंत्र्यांकडून बळ मिळत नसल्याचे सांगत असले, तरी पालकमंत्र्यांच्या गोटातून बळ द्यायचे तरी कोणाला?, बळ देण्यासारखे तरी पाहिजेत ना? असा सवाल पुढे केला जात आहे. या दरीमुळे पालकमंत्र्यांच्या जवळचे आणि पालकमंत्र्यांकडून कामे होत नसल्याची खंत व्यक्‍त करणारे, अशी दुफळी शिवसेनेत माजू लागली आहे.

Web Title: shivsena politics