ऊस उत्पादकांसाठी शिवसेना रस्त्यावर 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 जानेवारी 2019

""शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी, पिकविम्याचे पूर्ण पैसे मिळावेत यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्याबरोबरच कारखान्यांनी थकविलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार सर्व पैसे मिळावेत, यासाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.'' 
-नितीन बानुगडे-पाटील (उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ) 

सातारा - राज्यभरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची गेल्या तीन वर्षांपासूनची थकित एफआरपीची रक्कम चार हजार कोटींवर गेली आहे. 

तर जिल्ह्यातील कारखान्यांकडून 15 टक्के व्याजासह ही रक्कम 100 कोटींच्या घरात जात आहे. या विरोधात आवाज उठविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. याची पहिली ठिणगी उद्या (सोमवारी) कोरेगाव तालुक्‍यात पडणार आहे. जिल्हा शिवसेना व युवा सेनेतर्फे एफआरपीसाठी तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांचा महामोर्चा काढण्यात येणार आहे. 

ऊसदरासाठी आता कारखान्यांची एफआरपी किती व साखरेचे बाजाराभावात दर काय, हे पाहूनच निर्णय घेतला जातो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा ऊसदर पाहायला मिळतो. शेतकरी संघटनांनी याबाबत आवाज उठवूनही शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी कोणताच कारखाना देऊ शकलेला नाही. यावर्षी कारखाने सुरू होऊन दोन महिने झाल्यानंतर जिल्ह्यातील अजिंक्‍यतारा व जयवंत शुगर या दोन कारखान्यांनी पहिला हप्ता जाहीर केला आहे. ही एफआरपीची रक्कम दोन टप्प्यातच दिली जाणार आहे. कायद्यानुसार ऊस कारखान्याला घातल्यानंतर 14 दिवसांमध्ये उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा नियम आहे. पण, कोणीही कारखान्याने दिलेल्या वेळेत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केलेले नाहीत.

संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांची तीन वर्षांपासूनची थकित एफआरपीची रक्कम चार हजार कोटींच्या घरात गेली आहे. केवळ 38 टक्के शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम मिळाली असून, उर्वरित 62 टक्के शेतकरी आजही एफआरपीच्या रकमेपासून वंचित आहेत. आता यावर्षी साखरेचे दरही गडगडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांच्या मागणीनुसार एकरकमी एफआरपी अधिक 200 रुपये हा दर देणे कोणत्याच कारखान्याला शक्‍य झालेले नाही. किमान कारखान्यांनी एफआरपीनुसार दर देणे गरजेचे आहे. त्यालाही दोन टप्पे केल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे. हा शेतकऱ्यांचा संताप "कॅश' करण्यासाठी ऊसदराच्या आंदोलनात शिवसेनेने उडी घेतली आहे. कोरेगाव येथे उद्या (सोमवारी) युवा सेना व शिवसेनेच्या वतीने शेतकऱ्यांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने यावेळेस ऊसदराच्या आंदोलनात उडी घेतल्याने शेतकरी संघटनांच्या नेत्यांतून आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आजपर्यंत शेतकरी संघटनांना जे जमले नाही, ते शिवसेना व त्यांची युवा सेना करून दाखविणार का, याची उत्सुकता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आहे. 

""शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करून त्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी आणि शेतीमालाच्या हमीभावासाठी, पिकविम्याचे पूर्ण पैसे मिळावेत यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्याबरोबरच कारखान्यांनी थकविलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे एफआरपीनुसार सर्व पैसे मिळावेत, यासाठी आता शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे.'' 
-नितीन बानुगडे-पाटील (उपाध्यक्ष, कृष्णा खोरे विकास महामंडळ) 

Web Title: Shivsena road for sugarcane growers