शिवसेना दोन मंत्र्यांच्या विरोधात 'धनुष्य' उचलणार : महेश कोठे 

शिवसेना दोन मंत्र्यांच्या विरोधात 'धनुष्य' उचलणार : महेश कोठे 

सोलापूर : श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या सोलापुरातील दोन्ही मंत्र्यांच्या विरोधात शिवसेना 'धनुष्य' उचलेल, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी दिला. हद्दवाढीतील कामाबाबत महापालिकेचा ठराव डावलून नवी यादी बेकायदेशीरपणे करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. 

हद्दवाढीतील 17 कोटींच्या कामाची यादी बदलली हे वृत्त शनिवारी 'सकाळ'मध्ये प्रसिद्ध झाले. त्या वेळी भाजपच्याच अनेक नगरसेवकांनी त्या संदर्भात तीव्र आक्षेप घेत खासगीत नाराजी व्यक्त केली. कोठे यांनी शिवसेनेची भूमिका विशद केली. या वेळी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, गणेश वानकर, प्रथमेश कोठे, शहरप्रमुख प्रताप चव्हाण, परिवहन समितीचे सदस्य विजय पुकाळे उपस्थित होते. कोठे म्हणाले, "शासनाचा 80 टक्के आणि महापालिकेचा 20 टक्के हिस्सा अशा पद्धतीने हा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार महापालिकेने हद्दवाढीतील प्रत्येक नगरसेवकांना न्याय मिळेल असा ठराव केला होता. मात्र, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी हा निधी मीच आणला आहे असा दावा करीत, आपल्याच विधानसभा मतदारसंघात मिळेल अशा पद्धतीने नवीन यादी तयार केली. वास्तविक पाहता ही यादी महापालिकेकडे मंजुरीसाठी येणे अपेक्षित होते, मात्र शासनाकडून थेट जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आली आहे. ही अतिशय चुकीची पद्धत आहे.''

महापालिकेने केलेल्या ठरावामध्ये पाण्याचे अनेक प्रस्ताव होते. मात्र, ते डावलून रस्त्याची कामे सुचविण्यात आली आहेत. तसेच ही कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत. त्यामुळे यादी बदलण्यामागे कोणाचे हित होणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. यादी रद्द झाली नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असेही कोठे म्हणाले.

मंत्र्यांचे भांडण 'सीएम'च्या कानावर घालणार 

पालकमंत्री विजय देशमुख व सहकार मंत्री सुभाष देशमुख या दोन मंत्र्यांमधील भांडणामुळे शहरवासीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. एकमेकांचा निधी पळविण्यापेक्षा या दोन्ही मंत्र्यांनी निधी आणण्यात चढाओढ करावी. त्यामुळे शहरवासीयांचा फायदा होईल. मात्र, सोलापुरात उलटे चित्र आहे. मंत्र्यांमधील भांडणाचा फटका शहराला बसत आहेच, शिवाय भाजपलाही निश्‍चित बसेल, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलणार आहे, असेही कोठे म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com