शिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

केडगावमधील हत्येप्रकरणी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांच्या कारवाईत व्यत्यय आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार आहेत. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी आज शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

नगर : केडगावमधील हत्येप्रकरणी रास्ता रोको आंदोलन करून पोलिसांच्या कारवाईत व्यत्यय आणल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शिवसैनिक मंगळवारी अटक करून घेणार आहेत. या संदर्भात स्थानिक नेत्यांनी आज शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेतली.

शिवसैनिकांचे मृतदेह पाहून संताप होणे साहजिक आहे, मात्र शिवसैनिकांनी कोणताही उद्रेक होवू न देता शांतता व संयमाने परिस्थिती हाताळली, अशी भावना जिल्ह्यातील नेत्यांनी ठाकरे यांच्या कानावर घातली. तरीही पोलीसांनी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल केले. त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गुन्हे  दाखल झालेले सर्व सहाशे शिवसैनिक मंगळवारी (दि.१७) मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी स्वत:ला अटक करवून घेणार आहेत.

शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, प्रा. शशिकांत गाडे, रावसाहेब खेवरे, खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह शिवसेनेचे सर्व जिल्हा, तालुका पदाधिका-यांनी तसा निर्णय घोषित केला.

केडगाव येथे पोटनिवडणुकीनंतर सात एप्रिलला शिवसेना उपशहर प्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे या दोन शिवसैनिकांची हत्या झाली. या हत्येनंतर शिवसैनिकांनी रास्ता रोको, दगडफेक, पोलीस कर्मचारी, अधिका-यांना धक्काबुक्की व वाहनांची तोडफोड केली होती.

याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह सेनेचे नगरसेवक, पदाधिकाऱ्यांसह ६०० जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Shivsena Workers will Arrested self on Tuesday