आमचं आज ठरणार ! दुधवडकरांसोबत शिवसेना जि. प. सदस्यांची बैठक

Shivsena ZP Members Meeting With Arun Dudhawadkar Kolhapur Marathi News
Shivsena ZP Members Meeting With Arun Dudhawadkar Kolhapur Marathi News

कोल्हापूर - जिल्हा परिषद पदाधिकारी निवडणुकीत शिवसेना सदस्यांचा पाठिंबा कोणाला असणार, याबाबत संभ्रम आहे. तो उद्या (ता. 25) दूर होणार आहे. सेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या उपस्थितीत नेत्यांची बैठक होणार असून त्यात पाठिंब्याचा निर्णय होणार आहे. 

जिल्हा परिषदेत सेनेचे 10 सदस्य आहेत. हे सदस्य जिकडे जातील त्याला सत्ता राहील, अशी स्थिती आहे. सद्यस्थितीत 7 सदस्यांचा भाजपला तर 3 सदस्यांचा कॉंग्रेस-राष्ट्रवादीला पाठिंबा आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने सेना आता आघाडीला पाठिंबा देईल, अशी चर्चा आहे. मात्र स्थानिक राजकारणामुळे महाविकास आघाडीला सदस्य पाठिंबा देणार का, हा खरा प्रश्‍न आहे. 

कॉंग्रेससोबत जाण्यास नकार

माजी आमदार चंद्रदीप नरके यांना कॉंग्रेसच्या पी. एन. पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे श्री.नरके यांचा गट कॉंग्रेससोबत जाण्यास इच्छुक नाही. अगदीच वेळ आली तर पंचायत समिती सभापती निवडीतही मग महाविकास आघाडीचा पॅटर्न आणावा व करवीर पंचायत समितीचे सभापतिपद नरके गटाला द्यावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. नरके गटाचे 3 सदस्य आहेत. याबाबतही श्री. दुधवडकर यांच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्‍यता आहे. माजी आमदार सत्यजित पाटील गटाचे 2 सदस्य आहेत. गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने हा गट भाजपसोबत राहील, अशी चर्चा आहे.

यादव यांना पद देण्याची मागणी

माजी आमदार सुजित मिणचेकर यांच्या पराभवात भाजपचा मोठा वाटा असल्याने भाजपसोबत जाण्याचा त्यांचा विरोध आहे. मात्र आघाडीने त्यांचे एकमेव सदस्य प्रवीण यादव यांना एखादया पदावर संधी दयावी, अशी त्यांची मागणी आहे. 

घाटगे भाजपसोबत राहण्याची शक्यता

माजी आमदार संजय घाटगे यांचे पुत्र आंबरिष शिक्षण सभापती आहेत. तर त्यांचे सासरे अरुण इंगवले हे भाजपकडून अध्यक्ष पदाचे दावेदार आहेत. श्री. इंगवले यांच्यासाठी श्री. घाटगे हेच यंत्रणा राबवत असल्याने ते भाजप सोबत राहतील, अशी स्थिती आहे. माजी आमदार उल्हास पाटील यांच्या गटाचा 1 सदस्य असून ते पहिल्यापासून आघाडीसोबत आहेत. खासदार संजय मंडलिक गटाचे दोन सदस्य असून ते आघाडीसोबतच आहेत. 


पदाची ऑफर निर्णायक 

सेनेचे 10 सदस्य असले तरी सहा गट आहेत. प्रत्येकाची वेगळी अडचण आहे. येणाऱ्या प्रत्येक सदस्याला पदाची अपेक्षा आहे. या अपेक्षा कशा पूर्ण होणार यावरच महाविकास आघाडीत सेनेचे सदस्य सहभागी होणार की नाही, याचा निर्णय होणार आहे. पालिकेत सेनेचा पाठिंबा मिळवण्यात आमदार सतेज पाटील यांची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्यामुळे आमदार पाटील सेनेचा पाठिंबा मिळवण्यात यशस्वी होतील, अशी खात्री कॉंग्रेसचे सदस्य देत आहेत. 

बैठकीचा निरोप नाही
शिवसेना सदस्यांची बैठक बोलावण्याबाबत चर्चा असली तरी मला बैठकीचा अजून निरोप आलेला नाही. तसेच मी भाजप किंवा अन्य कोणत्या नेत्याशी पाठिंब्याबाबत चर्चा केलेली नाही. 
- चंद्रदीप नरके, माजी आमदार  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com