शिवशाही बसची ट्रॅक्टरला धडक; एक जखमी

हरिभाऊ दिघे 
गुरुवार, 31 मे 2018

संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डोळासणे शिवारात शिवशाही एस.टी. बसने पाण्याचा टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून भीषण धडक दिली.

तळेगाव दिघे (जि.नगर) : संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या डोळासणे शिवारात शिवशाही एस.टी. बसने पाण्याचा टँकर घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला पाठीमागून भीषण धडक दिली. गुरुवारी (ता.31) दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ट्रॅक्टर चालक जखमी झाला, तर बसचा दरवाजा तुटल्याने बसमधील प्रवाशांना काचा फोडून नागरिकांनी सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे.

राज्य परिवहन मंडळाची शिवशाही बस (क्र. एम.एच. 09 ई.एम. 1943) चालक रविंद्र अभिमान कोळी हा बसमधून 30 ते 35 प्रवाशांना घेऊन पुणे येथून आळेफाटा मार्गे नाशिककडे येत होता. गुरुवारी दुपारी पावणे बारा वाजेच्या सुमारास ही बस महामार्गावरील डोळासणे शिवारात असणाऱ्या सह्याद्री ढाब्यासमोर आली. त्याच दरम्यान ट्रॅक्टर (क्र. एम.एच. 17 ए.ई.8596) चालक संजय बाबाजी कुडेकर (रा. पिंपळगाव देपा) हा घारगावकडून पिंपळगाव देपा मार्गे जात होता. दरम्यान भरधाव वेगात शिवशाही बसने ट्रॅक्टरच्या मागील बाजूस असणाऱ्या पाण्याच्या टँकरला धडक दिली. धडक दिल्यावर ट्रॅक्टरचे टायर फुटून पाण्याचा टँकर पलटी झाला. तर बसच्या पुढील बाजूचे नुकसान झाले. बसचा दरवाजा तुटला. आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेंव्हा बसमधील ३० ते ३५ प्रवाशी पुर्णपणे घाबरुन गेले होते. शेवटी नागरिकांनी बसच्या काचा फोडून या सर्व प्रवाशांना बसमधून सुखरुप बाहेर काढले. यामध्ये ट्रॅक्टर चालक संजय कुडेकर हा जखमी झाला. या अपघातामध्ये शिवशाही बसचे व ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

नवनाथ येशू खेमनर (रा.पिंपळगाव देपा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव तालुका पोलीस ठाण्यात शिवशाही बस चालकाविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिस निरीक्षक दिलीप निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. आदिनाथ गांधले अधिक तपास करीत आहे.

Web Title: Shivshahi bus accident; One injured