'शिवशाही' चा आरामदायी नव्हे...त्रासदायक प्रवास !

संजय साळुंखे
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

- सदोष वातानुकुलित यंत्रणा. 
- अप्रशिक्षित चालक वर्ग. 
- मोडक्‍या-तोडक्‍या सीट. 
- अस्वच्छतेचे प्रमाण जास्त. 
- बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण जास्त 

 

सातारा : आरामदायी प्रवासाठी या गोंडस वाक्‍याचा वापर करत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेत "शिवशाही' दाखल झाली. या सेवेतून प्रवासासाठी जादा तिकीट दर आकारला आहे. मात्र, त्या तुलनेत सुविधांची ओरडच आहे. अप्रशिक्षित चालक, सदोष वातानुकुलित यंत्रणा, मोडक्‍या सीट, अस्वच्छता... अशा अनेक तक्रारी प्रवाशांतून होत आहेत.
 
"प्रवाशांच्या सेवेसाठी' हे ब्रीदवाक्‍य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या साध्या बसने (लालपरी) महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील लोकांची सोय केली. त्यामुळे या "लालपरी'शी प्रवाशांचे आपुलकीचे नाते निर्माण झाले. "लालपरी'ची सेवा चांगल्या पद्धतीने सुरू असतानाच युती शासनाच्या काळात "वरिष्ठ' पातळीवर सूत्रे हालली आणि आरामदायी प्रवासासाठी या गोंडस नावाखाली "शिवशाही' निमआराम बसने प्रवेश केला.

या बसने प्रवास करण्यासाठी जादा तिकीट दर आकारला जातो. त्यामुळे अगदी पहिल्या दिवसापासूनच या बससेवेकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. तरीही महामंडळाने लांब पल्ल्याच्या सेवांमध्ये "शिवशाही'च्या फेऱ्या ठेवल्या. कालांतराने त्यात वाढ केली. साध्या बसच नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने "शिवशाही'तून प्रवास करावा लागत आहे. अशीच काहीशी गत सातारा-पुणे विनावाहक-विनाथांबा बससेवेची झाली आहे.

प्रवाशांना आर्थिक भुर्दंड 

प्रवाशांची कसलीही मागणी नसताना या सेवेत "शिवशाही'च्या दिवसभरात तब्बल 16 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या नियोजनानुसार साध्या बसच्या 40 ऐवजी 28 फेऱ्या करण्यात आल्या. तर, "शिवशाही'च्या फेऱ्या 12 वरून 28 करण्यात आल्या. साध्या बसच्या फेऱ्या कमी झाल्याने सहाजिकच प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. 

हेही वाचा - पुणेकरांसह सातारकरांच्या खिशावर अतिरिक्त भार

"शिवशाही'वर असणारे चालक अप्रशिक्षित

"शिवशाही' बससेवेचा विचार केला तर तिकीट दराच्या तुलनेत पुरेशा सुविधा नसल्याची तक्रार प्रवाशांतून होताना दिसते. "शिवशाही'वर असलेले चालक हे महामंडळाचे कर्मचारी नाहीत. खासगी तत्त्वावर ते नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे या चालकांच्या प्रशिक्षणाचा मुद्दाही प्रवाशांतून उपस्थित केला जातो. "शिवशाही'वर असणारे अनेक चालक हे अप्रशिक्षित आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताशी खेळण्याचा हा प्रकार असल्याचे उघडपणे बोलले जाते. महामंडळाचे कर्मचारी लक्ष देत नसल्याने "शिवशाही' बसमध्ये कायम अस्वच्छता असते. 

"शिवशाही'च्या नादुरुस्तीचे प्रमाण जास्त 

अनेक बसमध्ये मोडक्‍या-तोडक्‍या सीट आहेत. अनेक सीट या स्लीप होत नाहीत. या बसमधील वातानुकुलित यंत्रणेविषयीही अनेक तक्रारी आहेत. बसमध्ये वातानुकुलित यंत्रणा सुरू केल्यानंतर काही प्रवाशांना श्‍वसनाचा त्रास होतो. अनेकांना गुदमरल्यासारखे होते. "शिवशाही'च्या नादुरुस्तीचे प्रमाणही जास्त आहे. अनेकदा रस्त्यातच या बस बंद पडल्याचे दृश्‍य पाहायला मिळते. असा प्रसंग निर्माण झाल्यास पर्यायी व्यवस्थाही नाही. अनेकदा प्रवाशांना जादा तिकीट काढून नंतर साध्या बसने प्रवास करावा लागतो. अशा अनेक तक्रारी असतानाही "शिवशाही'ची सेवा प्रवाशांच्या माथी मारली जात आहे.

हेही वाचा - 'शिवशाही'तून प्रवाशांची पाकीटमारी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 'Shivshahi' Bus Journey Is Becoming Tragic But Not Comfortable