भावी पिढीसाठी शिवसह्याद्री कूपर कार्पोरेशनचा अनाेखा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 20 January 2020

स्पेलिंग बी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित केली जाते. आत्तापर्यंत या स्पर्धांमधून अनेक भारतीय विद्यार्थ्यांनी उज्जवल यश संपादन केले आहे. या स्पर्धेची ओळख सातारा आणि परिसरातील विद्यार्थ्यांना व्हावी या हेतूने शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सातारा जिल्ह्यात प्रथमच स्पेलींग बी स्पर्धेचे आयोजन केले होते.
 

सातारा ः येथील शिवसह्याद्री इंग्लिश मिडीयम स्कूल आणि कूपर कार्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येथे नुकत्याच झालेल्या स्पेलींग बी स्पर्धेत मोना स्कूलच्या चित्रा स्वामी हिने विजेतेपद मिळविले. या स्पर्धेत सातारा इंग्लिश मिडियम स्कूलची सेजल विनायक बगाडे हिने उपविजेतेपद मिळविले.
 
या स्पर्धेत सातारा शहरातील विविध शाळांतील 32 स्पर्धक सहभागी झाले होते. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय मानकांनूसार झाली. या स्पर्धेतील अंतिम फेरीत मोना स्कुलच्या चित्रा स्वामी आणि सातारा इंग्लिश मीडियम स्कुलची सेजल बगाडे यांच्यात चुरस झाली. त्यामध्ये चित्राने बाजी मारली.

नक्की वाचा -  साताऱ्यात रंगणार सकाळ स्कूल क्रिकेट लीग

स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून चार्टर्ड अकाउंटंट वंदना सक्‍सेना आणि पिपाल झाड या नामांकित प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका करुणा बलानी यांनी काम पाहिले. स्पर्धेतील यशस्वीताना वंदना सक्‍सेना, करुणा बलानी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, पदक , प्रमाणपत्र तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात आले. यावेळी कूपर कार्पोरेशनच्या संचालिका मनीषा कूपर, शिवसह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ऍड. धन्वंतरी वांगडे उपस्थित होत्या.

यावेळी वंदना सक्‍सेना म्हणाल्या शिवसह्याद्री आणि कूपर कार्पोरेशनने सातारा जिल्ह्यात स्पेलींग बी स्पर्धेचे आयोजन करुन येथील विद्यार्थ्यांना एक नाविन्यपुर्ण व्यासपीठ उपलब्ध करुन दिले आहे. खरं तर आजची स्पर्धा ही आंतरराष्ट्रीय स्तराच्या दर्जेचीच होती.
 
करुणा बलानी म्हणाल्या स्पेलींग बी सारखे महत्वपुर्ण व्यासपीठ साताऱ्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्याने त्यांना प्रेरणा मिळाली आहे. ही स्पर्धा म्हणजे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व सिद्ध करण्याची संधीच म्हणावी लागेल. या स्पर्धेतून साताऱ्यातील समृद्ध पिढीचे दर्शन घडले.

हेही वाचा -  तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही अनसंग

मनीषा कूपर म्हणाल्या स्पेलींग बी स्पर्धेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन त्यांच्यामधील कौशल्य सिद्ध केले. ही केवळ कौतुकास्पदाची बाब नव्हे तर धाडसाची आहे. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी वाचन करावे, मनन करावे. शाळा, शिक्षक तसेच पालकांचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहे. मुलांच्या गुणांना चालना मिळावी या हेतुने आयोजिलेली ही स्पर्धा एक सुरुवात आहे. आगामी काळात आम्ही शिवसह्याद्री समवेत विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प केला आहे.

ऍड. धन्वंतरी वांगडे म्हणाल्या सातारा शहरातील विद्यार्थ्यांमध्ये सुप्त गुण आहेत. त्यांच्यात कौशल्य आहे. परंतु विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकासाचा अभाव असल्याचे जाणवते. ते वृद्धींगत व्हावे यासाठी आम्ही स्पेलींग बी उपक्रमापासून प्रारंभ केला आहे. शालेय जीवनापासून व्यक्तीमत्व विकास घडविणारे उपक्रम विद्यार्थ्यांना मिळाले तर निश्‍चित त्यांच्या आयुष्यात त्यांना फायदा होतो.

जाणुन घ्या... महाराष्ट्राचे चित्ररथ केव्हा नव्हते संचलनात

कूपर कुटुंबिय नेहमीच सातारकरांसाठी नाविन्यपुर्ण गोष्टी करीत असतात. स्पेलींग बी उपक्रमास पाठबळ देऊन त्यांनी नवीन पिढी घडविण्यासाठी जणू छोटेसे रोपटेचे लावले आहे. समविचारी माणसं एकत्र आल्यानंतर निश्‍चित समाजासाठी आपण काही तरी अमूल्य देऊ शकतो याचा अनुभव आज वंदना सक्‍सेना, करुणा बलाणी, मनीषा कूपर यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आला आहे. स्पेलींग बी स्पर्धेमुळे शिवसह्याद्री आणि कपूर कार्पोरेशनबरोबर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात एक नवे नाते निर्माण झाल्याचा आनंद होत आहे.

शिवसह्याद्री इंग्लिश मीडियमच्या मुख्याध्यापिका निलिमा मोहिते यांनी आभार मानले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर , विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक तसेच नागरिक उपस्तिथ होते.

अवघे पाऊणशे वयोमान... 

सातारा या पश्‍चिम महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्यांच्या कुशीत वसलेल्या जिल्ह्यात सुमारे शतकभरापूर्वी कूपर, किर्लोस्कर आणि ओगले या तीन कुटुंबांनी पारतंत्र्यात असणाऱ्या, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींत मागासलेल्या देशाच्या औद्योगिक विकासाचे स्वप्न पहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी अहर्निश श्रम केले. यापैकी कूपर हे पारशी कुटुंब आजपासून साधारण दोनशे वर्षांपूर्वी सातारा येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या मातृभाषेनुसार ‘कूपर’ म्हणजे लाकडी पिंप (बॅरल) तयार करणारा सुतार. हाच त्यांचा खानदानी व्यवसाय होता. व्यवसाय करण्याची बीजे जणू जनुकीय संरचनेतच पेरली असावीत. आधीच्या पिढीने लावलेल्या व्यवसायाच्या रोपट्यास पुढील पिढ्यांनी वृक्षात रूपांतरित केले आणि आज सातारा येथे ‘कूपर कॉर्पोरेशन’चा अजस्र वृक्ष संपूर्ण देशाला सेवा पुरवत दिमाखाने उभा आहे. ‘कूपर फाउंड्री आणि कॉर्पोरेशन’चे जनक आणि सर्वेसर्वा असणारे फारोख कूपर यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या नेत्रदीपक औद्योगिक प्रवासावर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

- लेखिका सायली काळे 

फारोख कूपर हे स्वातंत्र्यपूर्व काळातील एक सुप्रसिद्ध उद्योजक धनजीशा कूपर यांचे नातू. परदेशी तंत्रज्ञानाचे महत्त्व जाणणारे धनजीशा कूपर यांचे पश्‍चिम महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, अर्थकारण आणि औद्योगिकीकरण या सर्वांतच मोठे योगदान. एक सुताराचा मुलगा ते मुंबई इलाख्याचे (Bombay Presidency) प्रधानमंत्री असा डोळे दीपवणारा प्रवास त्यांनी केला होता. १९२२ मध्ये सातारारोड या ठिकाणी ‘कूपर इंजिनिअरिंग कंपनी’ सुरू करून त्यांनी भारतातील पहिल्या डिझेल इंजिनाची निर्मिती केली. १९२० ते १९४० या काळात भरभराटीस आलेल्या धनजीशा कूपर यांच्या राजकीय, सामाजिक व औद्योगिक प्रगतीस पुढे उतार लागला. त्यातच १९४४ मध्ये एकुलते एक पुत्र नरिमन कूपर यांच्या अकाली मृत्यूनंतर अधिकच खचत गेलेल्या धनजीशा यांचा १९४७ मध्ये मृत्यू झाला. यानंतर १९४७-१९६० या काळात उरलेल्या कूपर उद्योगास चालविणे, परंपरागत सुरू असलेला दारूचा व्यवसाय सुरू ठेवणे आणि सॅम आणि फरोख या दोन मुलांसह आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करणे ही सर्व जबाबदारी नरिमन यांच्या पत्नी होमाई कूपर यांनी आपल्या शिरावर घेतली आणि समर्थपणे सांभाळली.

या दरम्यान प्राथमिक शिक्षण भारतात घेऊन माध्यमिक शालेय शिक्षणासाठी फारोख लंडनमध्ये (१९५५-६२) राहिले. याच काळात शिस्त, समानता, निष्ठा आणि मुख्य म्हणजे नेतृत्व अशी अनेक मूल्ये शिकावयास मिळाली असे फारोख सांगतात. पुढे मायदेशी आल्यावर एक वर्ष रयत शिक्षण संस्थेत विज्ञानाचे धडे गिरविले आणि नंतर १९६६ मध्ये पुणे येथील शेतकी महाविद्यालयात शेतीचे शिक्षण घेतले. औद्योगिक कुटुंबात जन्म झाला असला तरी शेतीची आवड त्यांच्या वडिलांकडूनच आली असावी. याच महाविद्यालयात ३० वर्षांपूर्वी म्हणजेच १९३३ मध्ये वडील नरिमन कूपर यांनी शिक्षण घेतले असल्याचे फारोख अभिमानाने सांगतात.

आयुष्याची पुढील वाटचाल ही कृषी क्षेत्रातच करावयाची असा विचार असताना दैवाने कूपर कुटुंबावर पुन्हा एकदा घाला घातला. ज्येष्ठ बंधू सॅम कूपर यांना मोठा अपघात होऊन ते उद्योग चालविण्यास असमर्थ झाल्याने आईच्या सूचनेवरून फारोख यांनी व्यवसायाची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली आणि तिथून पुढील चार दशकांत फारोख यांनी अविश्‍वसनीय उंची गाठली.
 
फारोख यांच्या हातात व्यवसायाची सूत्रे आल्यानंतर ज्येष्ठ बंधू सॅम कूपर पाहत असणाऱ्या ‘कूपर मेटल्स लिमिटेड’ची पार्श्‍वभूमी आणि आजूबाजूच्या परिसरातील उद्योगांना लागणारी लोखंडाची गरज लक्षात घेऊन त्यांनी १९८२ मध्ये पहिली फाउंड्री स्थापन केली. फाउंड्री म्हणजे धातूचे ओतकाम करणारा कारखाना जिथे लोखंड वा तत्सम धातू वितळवून गरजेनुसार साचे वापरून आकार देण्याचे काम केले जाते. अतिशय दूरदृष्टी ठेवून या फाउंड्रीची निर्मिती केल्याने आगामी काळात कोणत्याही अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्मितीसाठी कूपरचे अवलंबित्व संपुष्टात आले. अगदी अल्पकाळातच व्यवसायाची वाढ होऊन कूपरच्या मालकीच्या तीन फाउंड्री उभ्या राहिल्या. आजोबा धनजीशा यांच्याप्रमाणेच फारोख हेदेखील नवे तंत्रज्ञान आत्मसात करत काळाच्या पुढे चालणारे साजरे व्यक्तिमत्त्व आहे. पुढील काळात साताऱ्यासारख्या तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अविकसित असणाऱ्या ठिकाणी त्यांनी आपल्या कंपनीत स्वयंचलित प्रणाली उभी केली. परिसरातील उद्योगात जेव्हा कामे हस्तलिखितांद्वारे होत होती, त्या काळात फारोख यांनी संगणकीय प्रणालीचे महत्त्व जाणले.

सातारा शहरातील पहिला संगणक आणि तो ही प्रिंटरसहित आणून त्यांनी धनाजीशा यांची परंपरा मोडीत काढण्याची परंपरा सुरू ठेवली. स्वतःची फाउंड्री स्थापन केल्याने आगामी काळात इंजिन निर्मितीच्या क्षेत्रात कूपरने लीलया पदार्पण केले. ‘कूपर फाउंड्री’चे रूपांतर ‘कूपर कॉर्पोरेशन’मध्ये झाले. यामध्ये स्वयंचलित वाहनांच्या विविध भागांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. २००७ नंतर कंपनीने जनरेटर्सची निर्मिती सुरू केली आहे. कायमच ‘ग्राहकांची तुष्टता’ प्रधान मानत उत्पादनांची निर्मिती करताना कूपरने पर्यावरणाचेही भान राखण्यात योगदान दिले आहे. कूपरनिर्मित जनरेटर्स हे पर्यावरणपूरक म्हणून प्रसिद्ध आहेत. भारतीय रेल्वेपासून केरळ येथील नाविकांपर्यंत असंख्य ठिकाणी कूपर निर्मित गॅस व डिझेल इंजिन्सनी आपली मोहोर उमटवली आहे.
 
मुंबई, बेंगलोर, दिल्लीसारखी आंतरराष्ट्रीय विमानतळे अथवा बंदरे जवळ असणारी, मोठमोठ्या शैक्षणिक व संशोधन संस्थांचे सान्निध्य असणारी ठिकाणे निवडण्याऐवजी आपल्या पूर्वजांचे मूळ असलेले सातारा न सोडता येथेच समृद्ध उद्योग विकसित कसा केला, हे सांगताना फारोख सातारा व तेथील सांस्कृतिक वातावरणास महत्त्व देतात. आपलेपणाने जीव ओतून काम करण्याची जी संस्कृती लहान गाव व छोट्या शहरांमध्ये असते, ती महानगरांमध्ये शोधूनही सापडत नाही. याशिवाय कुशल कामगार वर्ग व यंत्रांना गरजेची असणारी कोरडी हवा यांमुळे साताऱ्यात कूपरचा विकास झाला.
 
एका पारशी कुटुंबाचा वारसा लाभलेल्या फारोख यांना व्यवसायातील कुशलतेबरोबर समाजभानही वारशाने लाभले आहे. फारोख कूपर हे स्वतःस व्यापारी (businessman) नव्हे तर उद्योजक (entrepreneur) मानतात. भारतात कंपन्यांना कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कायद्याचे बंधन २०१३ नंतर आले. कूपर कॉर्पोरेशन व वैयक्तिकरीत्या फारोख कूपर फार पूर्वीपासूनच समाजाप्रती असणारे आपले दायित्व देत आले आहेत. यामध्ये मुख्यतः कुमार व युवा मनांच्या जडणघडणीसाठी वाचनालये, कौशल्य विकास व गुणवत्ताधारित शिक्षणाचे प्रकल्प, पर्यावरणरक्षणासाठी जागरूकता व वनीकरण आणि क्रीडा क्षेत्रास सहकार्य यांचा समावेश आहे.

विविध ठिकाणच्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना आर्थिक मदतीशिवाय महाराष्ट्र पोलिसांच्या निर्भया पथकास दोन बोलेरो, कैद्यांच्या सुधारणेसाठी साताऱ्याच्या सेंट्रल जेलमध्ये सुधारकेंद्र, महिला विकासासाठी होमाई गृहिणी उद्योग, रुबी-कूपर व्हर्च्युअल क्लिनिक, शाळांना सॅनिटरी नॅपकिन्स व्हेंडिंग मशिन्स, डिजिटल वर्गखोल्या, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी स्कूलबसेस, अनेक शिष्यवृत्त्या, केंद्र सरकारच्या NEEM या कौशल्यविकास योजनेत सहभाग अशी अनंत सामाजिक कामे कूपरतर्फे नित्याने केली जातात.
 
कूपरचा सामाजिक कामांप्रमाणेच कूपर कॉर्पोरेशन व फारोख कूपर यांच्या कार्यास सन्मानित करणाऱ्या पुरस्कारांची यादी ही दीर्घ आहे. सातारा जिल्हा परिषद, आदित्य-बिर्ला ग्रुप, पुणे ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अशा अनेक मोठ्या संस्थांच्या सन्मानांसह ‘सकाळ’ मीडियाच्या ‘सातारा वैभव’ आणि ‘सकाळ पेपर्स प्रा. लि.’च्या २०१९ च्या ‘अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्कारानेही फारोख कूपर यांना गौरविण्यात आले आहे. उद्योगाव्यतिरिक्त फारोख यांना सायकलिंग, फोटोग्राफी असे अनेक व्यासंग आहेत. आपल्या शेतकी शिक्षणाचा वापर करून त्यांनी सातारा परिसरात पुष्पशेतीसह अनेक आधुनिक कृषिप्रयोग केले आहेत. कृषिशिक्षणात शिकलेली मूळ विज्ञानाची तत्त्वे आपल्याला उद्योग विश्‍वात उपयोगी ठरल्याचे ते सांगतात.

जरुर वाचा -  फरोख कूपर यांनी उलगडली आपली यशाेगाथा

आज आयुष्याची पाऊणशे वर्षे पूर्ण करत असताना जेव्हा सामान्य माणूस निवांत निवृत्तीची स्वप्ने बघत असतो, तेव्हा ही असामान्य व्यक्ती आपल्या कंपनीच्या पुढच्या वाटचालीचा आराखडा करण्यात अखंड व्यग्र आहे. आगामी काळात सातारा शहर हे जगभरात स्वयंचलित वाहनांच्या निर्मितीसाठी ओळखले जावे हे त्यांचे स्वप्न आहे. त्या अनुषंगाने त्यांनी ट्रॅक्टर निर्मितीची सुरुवातही केली आहे. आपली मूल्ये आणि संस्कार यांना जपत काळाच्या वेगाबरोबर माणसाने अखंड चालत राहावे असा संदेश ते देतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shivshayadri School And Cooper Corporation Conducted Satara Spelling Bee Competition