शोभायात्रेने जिंकली उपस्थितांची मने 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

कोल्हापूर - नोटाबंदी, सावित्रीच्या लेकी व प्राणी वाचवा, पृथ्वी वाचवा विषयांसंबंधी भाष्य करत महापालिकेच्या शाळांनी काढलेल्या शोभायात्रेने आज उपस्थितांची मने जिंकली. वैविध्यपूर्ण वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी गांधी मैदानावर शिस्तबद्ध संचलन करत "हम भी किसी से कम नही'चा प्रत्यय दिला. निमित्त होते, महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीतर्फे आयोजित शोभायात्रा संचलन स्पर्धा व मध्यवर्ती क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटनाचे. 

महापौर हसीना फरास यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन झाले. महात्मा फुले विद्यामंदिर व जीवन कल्याण विद्यालयातील विद्यार्थ्यांनी क्रीडाज्योत घेऊन दौड केली. उद्‌घाटनानंतर विद्यार्थ्यांनी सळसळत्या उत्साहात संचलन केले. महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंह, जवानांसह अन्य वेशभूषेत सकाळी साडेसातपासूनच पालकांसमवेत गांधी मैदानात आलेल्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट संचलन करत उपस्थितांची दाद मिळविली. शोभायात्रा संचलनात स्वातंत्र्यपूर्व काळ, वृक्ष काळाची गरज, पारंपरिक खेळ, स्त्री समाज जागृती, निसर्ग संदेश, वैज्ञानिक दृष्टिकोन विषयांवर सादरीकरण केले. 

या वेळी महापौर फरास यांनी सांघिकता, खिलाडूवृत्ती, राष्ट्रभक्‍ती, सचोटी, व्यक्तिमत्त्व विकास हे गुण परिपूर्ण खेळाडू तयार करत असल्याचे सांगितले. शासकीय शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत सुवर्ण व राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविल्याबद्दल झाकीर हुसेन उर्दू मराठी स्कूलमधील खदिजा नायकवडीचा सत्कार करण्यात आला. संचलनात महापालिकेच्या नऊ व खासगी अनुदानित सात शाळांनी सहभाग घेतला. शाहीर आझाद नायकवडी, विनायक लोहार, शुभांगी थोरात यांनी संचलनाचे परीक्षण केले. 

उद्‌घाटनप्रसंगी प्राथमिक शिक्षण समितीचे सभापती अजिंक्‍य चव्हाण, नगरसेविका सुनंदा मोहिते, अतिरिक्त आयुक्‍त श्रीधर पाटणकर, रसूल पाटील, बाळासाहेब कांबळे, उषा सरदेसाई उपस्थित होते. प्रशासनाधिकारी प्रतिभा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा निरीक्षक सचिन पांडव स्पर्धेचे संयोजन करत आहेत. आर. जी. कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय माळी यांनी आभार मानले. 

फुले विद्यामंदिर, सन्मित्र विद्यालयाची बाजी 
शोभायात्रा संचलनात महापालिकेच्या शाळा गटात महात्मा फुले विद्यामंदिर (फुलेवाडी), वीर कक्कय विद्यामंदिर, लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिर, तर खासगी अनुदानित गटात सन्मित्र विद्यालय, तेजस मुक्‍त विद्यालय, जीवन कल्याण विद्यालयाने अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. त्यांना महाराष्ट्र राज्य व खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघातर्फे सन्मान चषक देण्यात आला. 

Web Title: shobha yatra in kolhapur