साईमंदिरातील व्यवस्थापनावर "रिसर्च'; धक्कादायक निष्कर्ष आले समोर

सतीश वैजापूरकर
मंगळवार, 3 डिसेंबर 2019

आंध्र प्रदेशातील विदुषी पी. ग्यान प्रसुन्नबा यांनी "साईसमाधी मंदिर व्यवस्थापन' या विषयावर त्यांनी नुकतीच पीएच.डी. मिळविली. त्यांच्या पीएच.डी.तून साईमंदिरातील व्यवस्थापनाबाबत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. 

शिर्डी : साईदर्शनासाठी देश-विदेशातून येथे येणाऱ्या भाविकांना साईमंदिर, धर्मशाळा व प्रसादालयासह कुठे ना कुठे कटू अनुभवाला सामोरे जावे लागते. सौजन्यपूर्ण वागणुकीचा अभाव, ही येथील मुख्य समस्या झाली आहे. साईसमाधी मंदिरात गोंगाट असतो.

मंदिरात सौजन्य, शिस्त व शांतता असावी, साईसंस्थानाच्या धर्मशाळेतील वातावरण भक्तिमय व सौजन्यशील असावे. साईसंस्थानाची ऑनलाइन सेवा रडतखडत चालते, संकेतस्थळ अद्ययावत नसते, असे निष्कर्ष आंध्र प्रदेशातील विदुषी पी. ग्यान प्रसुन्नबा यांनी त्यांच्या पीएच.डी.साठी केलेल्या प्रबंधात नोंदविले आहेत. "साईसमाधी मंदिर व्यवस्थापन' या विषयावर त्यांनी नुकतीच पीएच.डी. मिळविली. 

vidushi

शिर्डी : आंध्र प्रदेशातील महिला साईभक्त पी. ग्यान प्रसुन्नबा यांनी पती प्रा. रघुनाथ रेड्डी यांच्या समवेत साईचरणी प्रबंध अर्पण केला. 

देश-परदेशातील भाविकांनी नोंदविले अनुभव 
तिरुपती (आंध्र प्रदेश) येथील श्री व्यंकटेश्‍वरा विद्यापीठाला पी. ग्यान प्रसुन्नबा यांनी हा प्रबंध सादर करून पीएच.डी. मिळविली. त्यासाठी त्यांनी "ऑनलाइन' प्रश्‍नावलीद्वारे भाविकांकडून अनुभव मागितले होते. देशभरातील विविध राज्यांतील सुमारे 700, तर परदेशांतील सुमारे 150 भाविकांनी त्यात सहभाग घेऊन आपले अनुभव नोंदविले. राज्यात आता नवे सरकार आले. 

हेही वाचा - टंचाईनिवारणासाठी 55 कोटींचा आराखडा 

विश्‍वस्त मंडळासाठी प्रबंध मार्गदर्शक 

काही दिवसांतच येथे नवे विश्‍वस्त मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त होण्याची शक्‍यता आहे. साईसंस्थानाचा कारभार भाविकांना सेवा देण्यासाठी आहे. त्या दृष्टीने त्यात सुधारणा व्हाव्यात, भाविकांना सर्व विभागांत सौजन्यशील वागणूक मिळावी, असे नव्याने येणाऱ्या मंडळाला वाटत असेल, तर त्यांच्यासाठी हा प्रबंध मार्गदर्शक ठरू शकतो. अडचणीचा विषय असल्याने, यापूर्वी एकाही विश्‍वस्त मंडळाने या समस्येकडे म्हणावे तसे लक्ष दिले नाही, तसेच त्यांना सौजन्याने वागण्याचे धडे देण्याचे धाडस आजवर कुणालाही शक्‍य झाले नाही. 

अवश्‍य वाचा - "ते' टपलेत मृतदेहासाठी 

कारभारात सुधारणा व्हायला हवी 

साईसंस्थानाच्या वेगवेगळ्या विभागांत भाविकांना कटू अनुभवांना सामोरे जावे लागते. काल-परवाच मला एका साईभक्ताने कटू अनुभव कळविले. उद्धटपणाची वागणूक मिळाल्याने आपण व्यथित झालो. येथील कारभारात सुधारणा व्हायला हवी. आम्ही एवढ्या लांबवरून साईदर्शनासाठी येतो; मात्र अशा अनुभवामुळे खूप दुःख होते, अशा भावना या साईभक्ताने व्यक्त केल्या. सौजन्याचा अभाव, ही येथील मुख्य समस्या आहे. आपण साईभक्तांच्या सेवेसाठी येथे आहोत, हे भाविकांना हिडीसफिडीस करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे. या प्रबंधातही भाविकांनी असेच अनुभव नोंदविले आहेत. 
- अर्चना कोते, नगराध्यक्ष, शिर्डी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shocking conclusions in the research of management of Saimandir