ई लिलावावरुन सोलापुरात व्यापारी- महापालिका कर्मचाऱ्यांत संघर्ष

विजयकुमार सोनवणे
मंगळवार, 10 जुलै 2018

या मोर्चात पालिकेतील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यासाठी कर्मचारी अर्ध्या दिवसाची रजा टाकतील आणि आयुक्‍त्यांच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी होतील. 
- अशोक जानराव, अध्यक्ष, महापालिका कामगार कृती समिती 

सोलापूर : गाळ्यांचा लिलाव रद्द करावा या मागणीसाठी गाळेधारकानी मोर्चा काढून लिलावासह आयुक्तांच्या भूमिकेला जोरदार विरोध केला. त्याच वेळी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करीत आहेत. ई - लिलाव करण्यामागे त्यांचा वैयक्तिक हेतू काहीच नाही. त्यामुळे त्यांच्या गाळ्यांचा ई - लिलाव झालाच पाहिजे अशी भूमिका कर्मचारी संघटनेने घेतली आहे. त्यामुळे सोलापुरात गाळे लिलावावरुन व्यापारी विरूध्द कर्मचारी संघर्ष होण्याची शक्यता आहे.

ई-लिलावास व्यापाऱ्यांनी दर्शविलेला विरोध आणि त्यामुळे भविष्यात निर्माण होणारी स्थिती याबाबत महापालिकेतील सर्व कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची काल रात्री उशीरा  बैठक झाली. तीत हा निर्णय घेण्यात आला. बुधवारी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,नवी वेस पोलिस चौकी, नवी पेठ, दत्त चौक मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. त्या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत होईल. शासनाच्या आदेशानुसार महापालिका आयुक्तांनी ई लिलावाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे.  

सध्या असलेल्या भाडेदरानुसार  गाळ्यापासून महापालिकेस दरमहा एक कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. नव्या आदेशानुसार भाड्याची कार्यवाही केल्यास हे उत्पन्न तब्बल 17 कोटींवर जाणार आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात दरमहा 16 कोटींची भर पडणार आहे. व्यापाऱ्यांनी ई - लिलावात सहभागी होऊन शहराच्या विकासात हातभार लावावा, आम्ही त्याचे स्वागत करू. मात्र, विनाकारण आयुक्तांना "टार्गेट' करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असे कामगार नेते  अशोक  जानराव यांनी सांगितले.

या मोर्चात पालिकेतील सर्व कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्यासाठी कर्मचारी अर्ध्या दिवसाची रजा टाकतील आणि आयुक्‍त्यांच्या समर्थनार्थ मोर्चात सहभागी होतील. 
- अशोक जानराव, अध्यक्ष, महापालिका कामगार कृती समिती 

Web Title: shops e auction in solapur