शॉर्ट फिल्मवाले होणार चित्रपट महामंडळाचे सभासद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

कोल्हापूर - "शॉर्ट फिल्मची निर्मिती करणाऱ्यांना अखिल भारतीय चित्रपट महामंडळात सभासद म्हणून समाविष्ट केले जाणार आहे; तसेच शॉर्ट फिल्म केवळ हौस व प्रदर्शनापुरतीच न राहता त्यातून आर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी महामंडळाच्या पुढाकाराने विविध मनोरंजन कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. त्यातून शॉर्ट फिल्मकर्त्यांना किमान आर्थिक खर्च उपलब्ध होण्याचा पर्यायही दिला जाणार आहे,'' असे आश्‍वासन अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी दिले.

मराठी नाट्य, चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ मल्टिपर्पज असोसिएशनतर्फे रामभाऊ चव्हाणदादा शॉर्ट फिल्म महोत्सवास आज सुरवात झाली. उद्‌घाटन महापौर हसीना फरास यांच्या हस्ते झाले. या वेळी ज्येष्ठ कलावंतांचा गौरव झाला. मराठी चित्रपट अभिनेत्री गुलाबबाई वंटमुरीकर, सरोज सुखटणकर, मेळा नाट्य कलावंत नृत्यांगणा मंगला विद्याते- साखरे, कॅमेरामन प्रकाश शिंदे यांच्यासह अन्य 42 कलावंत व तंत्रज्ञांचा सत्कार झाला. या वेळी अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, दिग्दर्शक सतीश रणदिवे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष सुजित चव्हाण, नगरसेवक अजिंक्‍य चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.

आकाराम पाटील म्हणाले, ""मराठी चित्रपटांचे कोल्हापूर जन्मस्थान आहे. चित्रपट कलावंत, तंत्रज्ञ, लेखकापासून ते दिग्दर्शकांपर्यंत फळी घडावी यासाठी ज्यांना कोठेही संधी मिळत नाही अशांच्या कलाकृतीला स्थान देण्यासाठी शॉर्ट फिल्म महोत्सव होत आहे. त्यासाठी राज्यभरातून 57 फिल्म आल्या आहेत. यातील विजेत्यांना रोख रक्कम, गौरवचिन्ह दिले जाणार आहे.''

शॉर्ट फिल्म महोत्सवातील विजेत्यांना रोख बक्षिसे देण्यासाठी चित्रपट महामंडळातर्फे 21 हजार रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा मेघराज राजेभोसले यांनी केली. अभिनेते भालचंद्र कुलकर्णी म्हणाले, ""नव्या काळात जुन्या कलावंतांचा विसर पडला आहे. अशा वेळी नवीन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी हा महोत्सव उपयुक्त ठरणारा आहे.'' यशवंत भालकर, संजय पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, सोमवारी (ता. 6) अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री दीपाली सय्यद, मानसी नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पारितोषिक वितरण सायंकाळी 5 वाजता शाहू स्मारक भवनात होणार आहे.

राज्यभरातून फिल्म
रविवारी व सोमवारी दोन दिवस विविध चित्रपट दाखविण्यात येतील. 30 सेकंदापासून 30 मिनिटांपर्यंत 57 चित्रपट दाखविले जाणार आहेत. कोल्हापूर, कोकण, मराठावाडा, विदर्भ, पुणे, मुंबईतून शॉर्ट फिल्म येणार आहेत.

Web Title: Short Film makers now become cinema board members