'कपल चॅलेंज'वर विवाहित जोडप्यांचा फोटोंचा पाऊस

अजित झळके 
Friday, 25 September 2020

गेल्या दोन दिवसांपासून कपल (नवरा-बायको) यांचे फोटो दणादण फेसबूकवर अपलोड होताहेत. "हॅश-टॅग कपल चॅलेंज' नावाची मोहिम सुरु झालीय. विवाहित जोडप्यांनी फोटोंचा पाऊस पाडलाय.

सांगली : गेल्या दोन दिवसांपासून कपल (नवरा-बायको) यांचे फोटो दणादण फेसबूकवर अपलोड होताहेत. "हॅश-टॅग कपल चॅलेंज' नावाची मोहिम सुरु झालीय. विवाहित जोडप्यांनी फोटोंचा पाऊस पाडलाय. त्यांना वाटतेय, काहीतरी भारी सुरु आहे. वास्तविक एका अतिशय प्रभावी आवरणाखालील हा मार्केटिंगचा फंडा आहे. 

येथे हरेक प्रकारचे फोटो अपलोड झालेत. "सारे करत आहेत, मी केले नाही तर बायको रुसेल' म्हणून काहींनी फोटो शेअर केलेत. याबाबत काहींनी प्रश्‍न उपस्थित केलाय, की ही भानगड काय? कुणी सुरवात केली? त्याचा उपयोग काय? काहींनी त्यावर टीका केली. त्यासाठी अश्‍लिल शब्दप्रयोगही झालेत. त्यामुळे ही भानगड काय, हे शोधायचे ठरवले आणि त्यातून काही भन्नाट गोष्टी समोर आल्या. 

कपल चॅलेंज हे पेज किंवा संकल्पना फेसबुकचाच "चेहरा' आहे. त्यामागे दुहेरी उद्देश आहे. त्यापैकी दाखवण्याचा उद्देश मांडताना (दाखवायचे दात) असे सांगितले गेलेय, की ही कल्पना अगदीच उत्स्फुर्तपणे सुचली. आम्हाला एक अशी जागा (संधी) उपलब्ध करून द्यायची होती, जिथे जोडपी भन्नाट गोष्टी करतील. जोडीने काहीतरी करण्याच्या नव्या कल्पना मांडतील. त्या इतरांना प्रेरक ठरतील. चांगले लेख असतील. संवाद झडेल. अनुभव कथन होईल. ही अशी जागा अशी असेल जेथे तुम्ही आनंद शोधू शकाल. पती-पत्नीसोबत व्यतीत केलेल्या "गुड टाईम' शेअर कराल.' 

अर्थात, ही संकल्पना कुणी वाचलीच नाही. त्यामुळे साऱ्यांना दे दणादण जोडीचे फोटो अपलोड केले. खरे तर नवरा बायकोने मिळून काहीतरी क्रिएटिव्ह केले असेल तर त्याचा फोटो अपेक्षित आहे... काही विदेशी जोडप्यांनी तसे फोटो अपलोड केलेले आहेत. या उपक्रमाचा अदृश्‍य हेतू मात्र मार्केटिंगचा आहे. आता खायचे दात असे, की या ट्रेंडमध्ये सहभागी होण्याचा दरवाजा "ट्राय इट'वर क्‍लीक केल्यावर उघडतो. त्यातून फोटो अपलोड करायला लावले आहेत. जग ही बाजारपेठ झालीय. त्यात लोकांचा तयार डाटा, नाव, गाव, मोबाईल क्रमांकासह या कंपनीने मिळवला आहे. जो ऑनलाईन बाजारात खूप कामाचा आहे. 

जोडप्यांचे फोटो त्यांची लाईफ स्टाईल दर्शवणारी आहेत. त्यानुसार विविध कंपन्यांना त्या-त्या ग्राहकापुढे काय वाढायचे, याचे वर्गीकरण करणे शक्‍य होणार आहे. अर्थातच, दिवाळीच्या तोंडावर हा फंडा आला आहे. त्यामुळे तो कंपन्या कॅश करणार यात शंकाच नाही. आता असेच ट्रेंड बाप-लेक, आई-बाबा, मित्र अशा स्वरुपात येईल. तुमची लाईफ स्टाईल जाणून घ्यायला बाजारपेठ उत्सुक आहे.  

 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A shower of photos of married couples on 'Couple Challenge'