श्रावणातील पोथीवाचन जोपासतेय वाचन परंपरा  

निवास मोटे
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

हा आनंद वेगळाच...
आमच्या कुशिरे गावामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यात ग्रामदैवत हनुमान मंदिर तसेच इतर मंदिरात विविध ग्रंथांचे वाचन केले जाते. या ग्रंथ वाचनाचा आणि ऐकण्याचा आनंद वेगळाच आहे. पूर्ण एक महिना आम्ही या भक्तीरसात चिंब होऊन जातो. 
- आनंदा माने, ग्रंथवाचक, कुशिरे तर्फ ठाणे ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर 

पोहाळे तर्फ आळते, कोल्हापूर : वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी शहरांमध्ये चर्चा सुरू असताना ग्रामीण भागांत मात्र, श्रावण महिन्यातील धार्मिक ग्रंथवाचनाच्या माध्यमातून वाचनसंस्कृती जोपासल्या जात असल्याचे चित्र अजूनही गावागावांत दिसते आहे. एक व्यक्ती ग्रंथवाचन करते आहे आणि त्याच्याभोवती बसलेले श्रोते मनोभावे ऐकत आहेत, असे सुंदर चित्र सध्या मंदिरांमध्ये आणि घराघरांत दिसत आहे.

विशेषत: कोल्हापूर परिसरात हे चित्र सर्रास पाहायला मिळते आहे. दिवसभर शेतीमध्ये राबणारी माणसे यानिमित्ताने सामूहिक वाचन, श्रवण करताना दिसतात. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या वाचनसंस्कृती थोर वसा हस्तांतरीत होताना दिसतो आहे.

कोल्हापुरातील पन्हाळा तालुक्यातील कुशिरे तर्फ ठाणे येथे श्रावण महिन्यात ग्रंथ वाचनाची परंपरा अनेक वर्षापासून अखंड सुरू आहे. सायंकाळी सात ते आठ या वेळेत या ग्रंथाचे वाचन केले जाते. वयोवृध्दांसाठी हे जणू मुक्त विद्यापीठच आहे. यंदाच्या वर्षी रामविजय या ग्रंथाचे वाचन सुरू आहे. आनंदा माने हे ग्रंथांचे वाचन करीत आहेत. ते एकेका ओवीचे वाचन करून त्या ओवीचा अर्थ सांगतात. श्रोत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी आवाजात चढउतार करून कथेतील प्रसंग ते खुलवून सांगतात. त्याला श्रोते मान डोलावून दाद देतात. अनेक श्रोते निरक्षर असूनही वारंवार श्रवण केल्याने या ग्रंथांतील अनेक प्रसंग पाठ झाले आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून श्रावण महिन्यात येथे धार्मिक ग्रंथाचे वाचन होत असल्याचे वयोवृध्द सांगतात. कुशिरेतील दत्त मंदिर, हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिरात पांडव प्रताप, हरी विजय, भक्ती विजय, रामायण, सिध्दांतबोध, दासबोध, शिवलीलामृत, हरिविजय आदी ग्रंथाचे वाचन झाले आहे. ग्रंथ समाप्तीला महाप्रसाद केला जातो.
दरम्यान, श्रावण महिन्यात पचनक्षमता कमी होते म्हणून आहारावर नियंत्रण ठेवण्यासाठी मांसाहार वर्ज्य केला जातो. उपवास सुरू असतात.

सृष्टी हिरवा शालू नेसून नटलेली असते. पावसामुळे शेतीची कामे तशी कमी असतात. त्यामुळे शेतकरी, वयोवृध्द संध्याकाळ झाली की, ग्रामदैवत हनुमान मंदिरासह इतर मंदिरात एकत्र जमतात आणि ग्रंथाचे श्रवण करतात. मोबाईलच्या युगात वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे मात्र, कुशिरेसारख्या गावांनी जोपासलेली ही वाचनसंस्कृती सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

हा आनंद वेगळाच...
आमच्या कुशिरे गावामध्ये दरवर्षी श्रावण महिन्यात ग्रामदैवत हनुमान मंदिर तसेच इतर मंदिरात विविध ग्रंथांचे वाचन केले जाते. या ग्रंथ वाचनाचा आणि ऐकण्याचा आनंद वेगळाच आहे. पूर्ण एक महिना आम्ही या भक्तीरसात चिंब होऊन जातो. 
- आनंदा माने, ग्रंथवाचक, कुशिरे तर्फ ठाणे ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shrawan month religios reading