आषाढी यात्रेवेळी गाभाऱ्यातून थेट प्रक्षेपणाद्वारे घेता येणार दर्शन

अभय जोशी
मंगळवार, 3 जुलै 2018

पंढरपूरः आषाढी यात्रेच्या वेळी येणाऱ्या सर्वच भाविकांना गर्दीमुळे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्‍य होत नाही. हे लक्षात घेऊन दर्शन रांगेत एलसीडी तर शहरात विविध पंधरा ठिकाणी मोठ्या पडद्यांवर श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील थेट प्रक्षेपणाव्दारे भाविकांना दर्शनाचा आनंद देण्याची यंत्रणा उभा करण्यात येणार आहे. राज्यभरातील एक हजार स्वयंसेवक यात्रा काळात पंढरपुरात राहून स्वच्छतेचे काम करणार आहेत.

पंढरपूरः आषाढी यात्रेच्या वेळी येणाऱ्या सर्वच भाविकांना गर्दीमुळे श्री विठ्ठल मंदिरात जाऊन दर्शन घेणे शक्‍य होत नाही. हे लक्षात घेऊन दर्शन रांगेत एलसीडी तर शहरात विविध पंधरा ठिकाणी मोठ्या पडद्यांवर श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील थेट प्रक्षेपणाव्दारे भाविकांना दर्शनाचा आनंद देण्याची यंत्रणा उभा करण्यात येणार आहे. राज्यभरातील एक हजार स्वयंसेवक यात्रा काळात पंढरपुरात राहून स्वच्छतेचे काम करणार आहेत. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांचा आनंद व्दिगुणित करण्यासाठी जे-जे करावे लागेल ते सर्व करण्याचा प्रयत्न मंदिर समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे, अशी माहिती श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

आषाढी यात्रेच्या नियोजनासाठी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीची बैठक आज (मंगळवार) दुपारी श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर त्यांनी यात्रेच्या नियोजना विषयी माहिती दिली.

श्री. भोसले म्हणाले, यंदाची आषाढी ही स्वच्छता , दर्शन व्यवस्था आणि जास्तीतजास्त चांगल्या सुविधा उपलब्ध असणारी अशी ग्रॅन्ड वारी होईल असे नियोजन केले आहे. यात्रेच्या वेळी 12 ते 14 लाख भाविक पंढरपूरला येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यादृष्टीने व्यवस्था करण्यात येत आहे. यात्रेसाठी आलेल्या सर्वच भाविकांना गर्दीमुळे मंदिरात जाऊन श्री विठ्ठलाचे दर्शन घेता येत नाही. हे लक्षात घेऊन दर्शन रांगेत एलसीडी बसवण्यात येणार आहेत. त्याच बरोबर शहरात पंधरा ठिकाणी स्क्रीन वर श्री विठ्ठलाच्या गाभाऱ्यातील थेट प्रक्षेपण करण्यात दाखवण्यात येईल त्याव्दारे भाविकांना दर्शन घडवण्याची व्यवस्था उभी केली जाणार आहे. त्याच ठिकाणी प्रसाद व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली जाणार आहे.

श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या नियोजित संत विद्यापीठासाठी एम.टी.डी,सी ची जागा तीस वर्षाच्या कराराने मिळावा यासाठी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे प्रस्ताव दिला आहे. विद्यापीठासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या तर संतपीठाचे भूमिपूजन केले जाईल अन्यथा या नियोजित विद्यापीठाच्या बृहत आराखड्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जाणार आहे. टोकनव्दारे दर्शन व्यवस्था आषाढीत गर्दीमुळे करता येणार नाही. यात्रेनंतर तीन टप्प्यामध्ये टोकन व्यवस्था कार्यान्वित करण्यात येणार आहे.

भक्त निवासचे काम अंतिम टप्प्यात आले आहे तथापी आषाढीमध्ये त्याचे उदघाटन करता येणे शक्‍य होत नसल्याने मुख्यमंत्र्यांकडून आषाढी वेळी या भक्त निवासची पाहणी व्हावी असे नियोजन केले जाणार आहे. त्यानंतर काम पूर्ण झाल्यावर रितसर उदघाटन केले जाईल.

उप जिल्हा रुग्णालय चालवण्यास घेण्या विषयीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्याला मान्यता मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु आहे, सशुल्क दर्शन व्यवस्थे व्यवस्थे विषयी लोकांमध्ये परस्पर विरोधी मत प्रवाह असल्याने या संदर्भात निर्णय घेतलेला नाही असे श्री.भोसले यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तर देताना नमूद केले.

स्वच्छतेसाठी एक हजार स्वयंसेवक येणार
राज्यभरातून येणारे एक हजार स्वयंसेवक टी शर्ट परिधान करुन स्वच्छतेचे काम करणार आहेत. या स्वयंसेवकांना सध्या पुणे व मुंबई मध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिवाय मंदिर समितीने नेमलेल्या कंपनीचे स्वच्छता कर्मचारी अखंड कार्यरत असणार आहेत. त्यामुळे वारीत लक्षणीय स्वच्छता राहील असा विश्‍वास श्री.भोसले यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्दे

  • आषाढीत दर्शन रांगेत एलसीडी तर पंधरा ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर श्री विठ्ठल दर्शन
  • राज्यभरातून एक हजार स्वयंसेवक स्वच्छतेसाठी येणार
  • आषाढी एकादशी दिवशी संतपीठ भूमिपूजन अथवा बृहत आराखड्याचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार
  • भक्तनिवासचे काम अपूर्ण असल्याने उदघाटन आषाढी नंतर
Web Title: shree vithal mandir to be taken by live telecast in ashadhi yatra