धोतमल, देशपांडे, बंदिष्टी, कामत, नाईक ठरले महाविजेते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 जानेवारी 2017

श्री गुरुदेव दत्त मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत

श्री गुरुदेव दत्त मालिकेंतर्गत प्रश्‍नमंजूषा स्पर्धेची सोडत
कोल्हापूर - साम मराठी वाहिनीवरील "श्री गुरुदेव दत्त' मालिकेंतर्गत झालेल्या प्रश्‍नमंजूषा स्पर्धेत श्रेया विजयकुमार धोतमल (कोरेगाव, सातारा), चिंतामणी नीळकंठ देशपांडे (किवळे, पुणे), कृतिका वैभव बंदिष्टी (पेडगाव, नगर), पूजा कामत (वास्को, गोवा), अल्पना नाईक (मुलुंड, मुंबई) हे भाग्यवान महाविजेते ठरले. या स्पर्धेची सोडत नुकतीच काढण्यात आली. जगभरातील भक्तांपर्यंत गुरुदेव दत्तांची महती पोचवण्यासाठी यंदाही साम मराठी मालिकेचे प्रसारण केले. डी एन विंड सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने प्रस्तुत केलेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यंदा महाराष्ट्र, गोवा, कर्नाटकासह दिल्ली, जम्मू काश्‍मीर, हिमाचल प्रदेशमधूनही देशभरातून प्रेक्षक पोस्टकार्ड व एसएमएसच्या माध्यमातून स्पर्धेत सहभागी झाले होते. कबीर बाग मठ संस्था (पुणे) मालिकेचे प्रायोजक होते.

कणेरी मठाचे अदृश्‍य काडसिद्धेश्‍वर स्वामी, डी एन विंड सिस्टीम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे दिनेश बुधले, नितीन वाडीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सोडत झाली.

सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार, उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर यांनी स्वागत केले.

सलग सातव्या वर्षी 8 ते 13 डिसेंबर या काळात या मालिकेचे प्रसारण झाले. गाणगापूर येथील श्री गुरुदेव दत्त स्थान माहात्म्य सांगणाऱ्या एकूण सहा भागांचा मालिकेत समावेश होता. नृसिंहवाडी येथील दत्त जयंती सोहळ्याचे प्रक्षेपणही घरबसल्या भाविकांना पाहायला मिळाले. मालिकेदरम्यान प्रेक्षकांसाठी रोजच्या भागावर आधारित प्रश्‍नमंजूषा झाली. मालिकेचे लेखन युवराज पाटील यांनी, तर संयोजन "साम'चे वरिष्ठ व्यवस्थापक महेंद्र कुरुंदकर यांनी केले.

बक्षीस वितरण लवकरच
प्रश्‍नमंजूषा स्पर्धेतील पाच महाविजेत्यांना चांदीचे नाणे व अभिषेकाची संधी मिळणार आहे. त्याशिवाय पंचवीस उपविजेत्यांना गुरुचरित्राची प्रत बक्षीस दिले जाणार आहे. उपविजेत्यांची नावे आणि महाविजेत्यांना बक्षीस वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

Web Title: shri gurudevdatta serial Quests contest draw