श्री सिद्धेश्वर महाराजांनी सोलापुरात "या' ठिकाणी स्थापन केले अष्टविनायक ! 

विजयकुमार सोनवणे
रविवार, 15 डिसेंबर 2019

कवी राघवांक यांनी लिहली माहिती

या अष्टविनायकांची तपशीलवार माहिती तेराव्या शतकात कर्नाटकातील कवी राघवांक यांनी सिध्दरामाच्या चरित्रात लिहूल ठेवली आहे. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे श्री गणेशाच्या सर्व आठही मुर्ती आजही अस्तित्वात आहेत.

सोलापूर ः ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोलापूर शहर व परिसरात श्री गणेशांची स्वहस्ते स्थापना केली आहे. आज (रविवार) श्री गणेश संकष्ट चतुर्थी आहे. त्यानिमित्त श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोलापुरात स्थापन केलेल्या अष्टविनायकांची ही माहिती. 

हेही वाचा... सोलापुरातील हेरिटेज इमारतींची वर्गवारी निश्चित

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
वीर गणपती, कुंभारी 

एक ः वीर गणपती, कुंभारी 
कुंभारी परिसरात श्री वीरेश गणपतीचे मंदीर आहे. पूर्वीच्या काळी सोलापूरहून श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या यात्रेस जाणारे भाविक यात्रेकरू आपला पुढील प्रवास सुखकर व्हावा यासाठी या गणपतीची प्रथम पूजा करून नंतर यात्रेस आरंभ करीत असत. या गणेशाच्या मंदीराच्या आजूबाजूला इतर देवतांची पाच मंदीरे आहेत. यामध्ये वीरेश गणपतीच्या उजव्या हाताला भगवान शंकर म्हणजेच महादेवाची पिंड आणि दुसऱ्या मंदीरात भगवानसूर्यनारायण यांचे मंदीर आहे. तर डाव्या हाताला आई अंबाबाई आणि भगवान विष्णुदेव यांची मंदीरे आहेत. वीरेश गणपतीच्या अगदी समोरच्या बाजूस रामभक्त हनुमानाचे मंदीर असून या सर्व देवतांची नित्यनियमाने पूजा अर्जा होते. ग्रामदैवत श्री सिध्दरामेश्‍वर महाराजांच्या यात्रेची सुरवात वीरेश गणपतीला तेलाचा दिवा लावूनच होते. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
बेनक गणपती, होटगी 

दोन ः बेनक गणपती, होटगी 
सोलापूरच्या अग्नेय दिशेला जुन्या कुंभारी ते होटगी रोडवरील होटगी शिवारात एका शेताच्या बांधावर बेनक गणपतीचे मंदीर आहे. बेनक याचा अर्थ पाठीराखा असा होतो. या गणपतीचे दर्शन घेतल्यास तो भक्तांचा पाठीराखा बनून त्यांची सर्व दुःखे दूर करतो अशी श्रध्दा आहे. या गणपतीचे मंदीर जुन्या पध्दतीचे असून अत्यंत लहान व दरवाजा-खिडकी झरोक्‍याएवढे अरुंद आहेत त्यामुळे बेनक गणपतीचे दर्शन भक्तांना चक्क जमिनीवर लोटांगण घालूनच घ्यावे लागते. याठिकाणी आतल्या छोट्याशा गाभाऱ्यात आणखकी काही देव-देवतांच्या गुळगुळीत झालेल्या लहान लहान चार ते पाच मुर्ती आहेत. जुन्या रस्त्याकडील मंदीराकडील भिंतीवर कन्नड मजकूर देवनागरी भाषेत लिहिलेला दिसतो. गेल्या काही महिन्यापूर्वी गणेश भक्तांनी या गणपतीजवळ सिध्दरामेश्‍वर महाराजांनी सोलापूरच्या परिसरात स्थापन केलेल्या अष्टविनायकांची माहिती देणारा फलक लावला आहे. 

हेही वाचा...  अक्कलकोटमधील महासोमयागाची समाप्ती 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
धुळी महांकाळ गणपती, रेवणसिध्देश्‍वर मंदीर 

तीन ः धुळी महांकाळ गणपती, रेवणसिध्देश्‍वर मंदीर 
सोलापूर शहराच्या दक्षिणेला असलेल्या सोलापूर-विजयपूर महामार्गावरील श्री रेवणसिध्देश्‍वर मंदीराच्या प्रांगणात धुळी महांकाळ गणपतीचे मंदीर आहे. या गणपतीचे नाव श्री नंदी म्हणजेच धुळी महांकाळ गणपती असे आहे. सिध्दरामेश्‍वरांचे मुळचे नाव लोकांच्या विस्मृतीत जाऊ नये यासाठी त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या गणपतीचे नाव धुळी महांकाळ असे ठेवले असावे, अशी अख्यायिका सांगितली जाते. श्री रेवणसिध्देश्‍वर मंदीरात दर्शनासाठी येणाऱ्या काही जाणकारांच्या मते महिला आपल्या चिमुकल्या बाळास या गणपतीच्या चरणावर वाहतात. यामुळे बाळाचे आयुष्य वाढते, अशी श्रध्दा आहे. 

प्रतिमेत याचा समावेश असू श्‍ाकतो: लोकं उभी आहेत
करीगण गणपती, देगाव 

चार ः करीगण गणपती, देगाव 
सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावरील देगाव लमाण तांड्यावरील करीगण गणपती होय. करीमसाहब मुल्ला यांच्या शेतात या गणपतीचे मंदीर आहे. या गणपतीची उंची चार फुट असे त्यामानाने मंदीर खूपच लहान आहे. करीगण या कन्नड नावाचा अर्थ काळे डोळे असलेला असा आहे. जुन्या कन्नड शब्दकोषात काळी सोंड असलेला हत्ती असाही आहे. या गणपतीच्या दर्शनाने विशेष फळ म्हणजे दृष्टिबाधा म्हजेच नजर लागलेल्या लहान बालकांची सर्व पिडा दूर होते व दृष्टिदोषाचे निवारण होते अशी या गणपतीची ख्याती आहे. हा गणपती एका मुस्लीम धर्मीय कुटुंबाच्या मालकीच्या शेतात असला तरी त्याचे अस्तित्व अत्यंत सुरक्षित आहे. याठिकाणी नित्यनियमाने पूजा करण्यात येते. येथे येणाऱ्या भाविकांचे भक्तीभावाने स्वागत आणि आदरभाव व्यक्त केला जातो, यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होते. 

हेही वाचा.... कंकणाकृती सूर्यग्रहण कसे होते

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
वीरकर गणपती, सम्राट चौक 

पाच ः वीरकर गणपती, सम्राट चौक 
सम्राट चौक बसवंती मंगल कार्यालयाच्या परिसरात वीरकर गणपतीचे मंदीर आहे. वीरकर म्हणजे शूरबाहू असलेला, बलदंड हाताचा असा होता. येथील श्री गणेशाची मुर्ती चार फुट उंचीची प्रशस्त आणि अत्यंत रेखीव स्वरूपाची आहे. येथे दररोज श्रीं च्या अंगावर अलंकार चढवून पूजा अर्चा व सकाळ-संध्याकाळ आरती करण्यात येते. यावेळी मंदीरात भाविकांची गर्दी असते. श्री सिध्दरामेश्‍वर यात्रेतील मानकरी सोमशंकर देशमुख यांच्या मळ्यामध्ये असलेल्या या गणपतीच्या मंदीरातच सिध्दरामेश्‍वर महाराजांनी स्थापन केलेल्या 68 लिंगापैकी 31 वे पशुपतीय लिंग आहे. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
वीरकोलाहल गणपती, बाणेगाव 

सहा ः वीरकोलाहल गणपती, बाणेगाव 
सोलापूर-बार्शी रोडवरील मार्डी मार्गावरील बाणेगावातील इरण्णा पाटील यांच्या वीटभट्टीजवळील शेतात या गणपतीचे मंदीर आहे. कन्नड भाषेत कोला म्हणजे देवाची पवित्र काठी, हल म्हणजे दात असा अर्थ होता. यावरून काठीसारख कठीण दात असलेल्या या वीरश्रीयुक्ती गणपतीला वीरकोलाहल गणपती असे नाव पडले असावे. हा गणपती आपल्या भक्कम दातांच्या सहायाने संकटरूपी असुरांचा नाश करून त्याला शरण आलेल्या भक्तांचे रक्षण करतो, अशी भक्तांची श्रध्दा आहे. मार्डीच्या देवीच्या दर्शनासाठी जाणारे भाविक हे या गणेशाचे दर्शन घेऊनच पुढे जातात. 

हेही वाचा.... संगीत सुरांनी भरलेला सुंदर वाडा 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
मश्रुम गणपती, तळेहिप्परगा 

सात ः मश्रुम गणपती, तळेहिप्परगा 
सोलापूर ते तुळजापूर रस्त्यावर या गणपतीचे मंदीर आहे. या गणपतीचे नाव देखील कन्नडमिश्रित उच्चारानेयुक्त मश्रुम गणपती असे आहे. कन्नडमध्ये मश्रुम याचा भावार्थ 'मसरू' म्हणजे 'दही', 'उम्म' म्हणजे 'खा' किंवा 'जेव' असा होतो. या दोन्ही शब्दांचा जोडशब्द दही खाणारा गणपती असा होतो. याच शब्दांचा अपभ्रंश होऊन कालांतराने मश्रुम गणपती असे एकेरी नाव रूढ झाले. पूर्वी जुन्या काळी या या गणपतीला दहीभाताचा खास नैवद्य दाखविण्याची प्रथा होती. या गणपतीचे मंदिर भक्कम दगडी बांधकामाचे आहे. त्याचबरोबर हिप्परगा तलावाशेजारी हे मंदिर असल्यामुळे त्याच्या रामणीयतेत आणखी भर पडली आहे. श्री गणेश जयंती व संकष्ट चतुर्थीला येथे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. 

छायाचित्राचा तपशील उपलब्ध नाही.
कामेश्वर अतिथी गणपती, शिवानुभव मंगल कार्यालय Caption

आठ ः कामेश्वर अतिथी गणपती, शिवानुभव मंगल कार्यालय 
सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या गणपतींमध्ये या मंदिराला खूप महत्व आहे. सराफ बाजार परिसरातील मीठ गल्लीतील शिवानुभव मंगल कार्यालयात छोटेखानी मंदिरात शेळगीचा गणपती विराजमान आहे. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची कीर्ती ऐकून त्याकाळी शेजारच्या शेळगी ग्रामातील हा गणपती सिद्धरामांच्या पवित्र सानिध्यात राहावयास मिळावे ही इच्छा मनात धरून सोन्नलगीमध्ये आला व त्याने सिद्धरामास आश्रय देण्याची विनंती केली, अशी पुराणकथा आहे. तेव्हा सिद्धरामेश्वरांनी त्याच्या इच्छेप्रमाणे, परंतु सोन्नलगीच्या उत्तर वेशीचे रक्षण करण्यासाठी उत्तर वेशीच्या बाहेरच राहा, अशी आज्ञा केली. ही उत्तर दिशा म्हणजे आजची तुळजापूर वेस होय. वेशीबाहेर या गणपतीची पूजाअर्चा व्यवस्थित होत नसल्याचे दिसून आल्याने गणेश भक्तांनी शिवानुभव मंगल कार्यालयात त्याची स्थापना केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shri sidheshwar maharaj established ashtvinayak temple in solapur