श्री विठ्ठलाच्या दर्शनाची आषाढीपूर्वी टोकन पध्दत

vitthal rukmini
vitthal rukmini

पंढरपूर ः श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांना तासन्‌तास दर्शन रांगेत उभा रहावे लागू नये यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर टोकन व्यवस्था (ऍक्‍सेस कार्ड) सुरु केली जाणार असल्याचे मागील कार्तिकी यात्रेच्यावेळी सांगितले गेले होते. येत्या आषाढी यात्रेपासून अशी व्यवस्था कार्यान्वित केली जाईल, असे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी आज (मंगळवार) सांगितले.

श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्राकाळात 25 ते 30 तासाहून अधिक वेळ भाविकांना दर्शनाच्या रांगेत थांबावे लागते. त्यामुळे वयोवृध्द तसेच महिला भाविकांचे कमालीचे हाल होतात. हे लक्षात घेऊन तिरुपतीच्या धर्तीवर श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी टोकन पध्दत सुरु करावी अशी मागणी अनेक वर्षापासून होत होती.

मागील आषाढी यात्रेच्या वेळी डॉ. अतुल भोसले यांच्या अध्यक्षतेखाली नवीन मंदिर समिती नियुक्त झाल्यावर कार्तिकी यात्रेपासून टोकन व्यवस्था सुरु केली जाईल असे जाहीर केले होते. तथापी कार्तिकी यात्रेवेळी मंदिर समितीला अशी व्यवस्था सुरु करता आली नव्हती. आता येत्या आषाढी यात्रेपूर्वी टोकन व्यवस्था निश्‍चितपणे सुरु केली जाईल असे आज डॉ. भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शासनाने नेमलेल्या त्रिलोक सिक्‍युरिटीज सिस्टीम प्रा.लि. या कंपनीच्या माध्यमातून टोकन व्यवस्था कार्यान्वित केली जाणार आहे.

मंदिरा लगतचे संत तुकाराम भवन, दर्शन मंडप, बस स्थानक, रेल्वे स्थानक, विविध ठिकाणचे वाहनतळ आदींसह प्रमुख मठांच्या मिळून सुमारे तीस ठिकाणी टोकन देण्यासाठी काऊंटर सुरु करण्यात येणार आहेत. केद्र शासनाच्या योजनेतून ही सुरु केली जाणार असल्याने समितीला त्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही.

टोकन पध्दतीमुळे उलाढाल वाढणार
श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी यात्राकाळात गर्दीमुळे 25 ते 30 तास आणि ऐरवी दोन ते चार तास रांगेत थांबावे लागते.टोकन पध्दती सुरु झाल्यावर टोकन वर नमूद केलेल्या वेळी भाविकांना मंदिरात जाऊन झटपट दर्शन घेता येईल.भाविक रांगेत तिष्ठत उभे राहण्या ऐवजी मग बाजारपेठेत जाऊन खरेदी करु शकतील. विविध मठ, मंदिरांना भेटी देऊ शकतील त्यामुळे साहजिकच बाजारपेठेतील उलाढाल वाढण्यास मदत होईल असा विश्‍वास समितीच्या पदाधिकाऱ्यामधून व्यक्त होत आहे.

पंढरुपुरात मांस व मद्य विक्री बंदीचा ठराव मंजूर
श्री क्षेत्र पंढरपूर मध्ये मद्‌य व मांस विक्रीस बंदी करावी यासाठी श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीकडून शासनास या विषयीचा प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी डॉ. भोसले व सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्याकडे वारकरी पाईक संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राणा महाराज वासकर, रामकृष्ण महाराज वीर, विठ्ठल महाराज नामदास, निवृत्ती महाराज नामदास, विठ्ठल महाराज पैठणकर, गणेश महाराज कराडकर, शाम महाराज उखळीकर आदींनी केली होती. त्याची दखल घेऊन आज तसा ठराव मंदिर समितीच्या बैठकीत करण्यात आला.

डॉ.भोसले, आमदार राम कदम, आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह मुख्यमंत्र्यांना भेटून आपण या संदर्भात शासनाने निर्णय घ्यावा, अशी मागणी करणार असल्याचे मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com