जोतिबा डोंगरावर श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी

निवास मोटे
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

जोतिबा डोंगर - येथील श्री जोतिबा मंदिरात असणाऱ्या आदी माया श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी (ता 16 ) होत आहे. या यात्रेची सर्व तयारी पूर्ण झाली असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

जोतिबा डोंगर - येथील श्री जोतिबा मंदिरात असणाऱ्या आदी माया श्री चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा गुरुवारी (ता 16 ) होत आहे. या यात्रेची सर्व प्रशासकिय तयारी पूर्ण झाली असून यासाठी सर्व शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.

पावसाळा असूनही या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून तीन लाख भाविक दर्शनासाठी येतात. त्या दृष्टीने पोलीस यंत्रणेने बंदोबस्ताचे सर्व नियोजन केल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. उद्या सांयकाळनंतर डोंगरावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल.

या यात्रेत घातपाताच्या घटना घडू नये म्हणून श्वानपथक व इतर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ही यात्रा रात्रीची भरत असल्याने विशेषतः जोतिबा घाटात कोणताही अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त, बिनतारी संच, लाईट व्यवस्था केली आहे. 

वाहतूक व्यवस्थेत बदल

गुरुवारी जोतिबा डोंगराकडे जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत बदल केला आहे . डोंगरावर जाणारी सर्व वाहने केर्ली, पांजरपोळ , कुशिरे फाटा मार्गे जातील व परताना ती दानेवाडी, वाघबीळ मार्गे जातील.

यात्रेसाठी जोतिबा डोंगराकडे रात्रभर कोल्हापुर आगारातून 53 एसटी गाड्या सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
भाविकांच्या सेवेसाठी सी पी आर रुग्णालय व जिल्हातील इतर अारोग्य पथके रात्रभर डोंगरावर असतील.

श्रावण षष्ठी यात्रा सूरळीतपणे पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे .डोंगरावर आलेला भाविक आपल्या घरी सुखरूप जावा, यासाठी आम्ही जीवाचे रान करू. भाविकांना एक सांगणे आहे की, अफवावर विश्वास ठेवू नका. संशयास्पद काही आढळल्यास पोलीसांशी संपर्क साधा. सर्वांनी मिळून यात्रा पार पाडू या. 

- संजीवकुमार झाडे 
सहाय्यक पोलीस निरिक्षक, कोडोली पोलीस ठाणे 
 

Web Title: Shrvan Shashti Yatra on Thursday on Jotiba Dongar