तब्बल 48 तासांनंतर सापडला शुभमचा मृतदेह; करगणी ओढ्यातून गेला होता वाहून

नागेश गायकवाड
Sunday, 18 October 2020

करगणी येथील शुभम संजय जाधव (वय 20) या वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तीव्र शोध मोहिमेनंतर तब्बल 48 तासांनंतर सापडला.

आटपाडी (जि. सांगली) ः करगणी येथील शुभम संजय जाधव (वय 20) या वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह तीव्र शोध मोहिमेनंतर तब्बल 48 तासांनंतर सापडला. यावर्षीच्या भीषण पावसात हा पाचवा बळी गेला. कळशीभर पाण्यासाठी टॅंकर मागे धावणाऱ्या दुष्काळग्रस्तांच्या जीवावरच यावर्षी अतिवृष्टीने घाला घातला आहे. 

करगणी येथील रामनगरमधील तरुण शुभम संजय जाधव (वय 20) हा गुरुवारी सकाळी दहा वाजता बंधाऱ्यावर गेला होता. ओढ्याला प्रचंड पाणी होते. बंधाऱ्यात पडून पाण्यासोबत तो वाहून गेला. दोन दिवस त्याचा शोध सुरू होता. रेस्क्‍यू टीमनेही तब्बल 36 तास त्याचा शोध घेतला. अखेर शनिवारी सकाळी अकरा वाजता घटनास्थळापासून एक किलोमीटर अंतरावर त्याचा मृतदेह सापडला. गेल्या दोन महिन्यांत तालुक्‍यात पाण्यात बुडून पाचवा बळी गेला. 

आटपाडी तालुक्‍यात सरासरी कसातरी दोनशे ते अडीचशे आणि जास्तीत जास्त तीनशे मिलिमीटर पाऊस पडतो. यातही दर तीन वर्षांनंतर एक वर्ष पावसाची पूर्ण दांडी असते. अर्ध्या तालुक्‍याला पिण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागतो. 2013 च्या दुष्काळामध्ये तालुक्‍यात टॅंकर भरण्यासाठीही पाणी नव्हते. संपूर्ण तालुक्‍याला बाहेरच्या तालुक्‍यातून पाणी आणून टॅंकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला होता, पण यावर्षी अति पावसामुळे तालुक्‍यातील पाच जणांचे आतापर्यंत बळी गेले आहेत.

आटपाडीच्या शुक ओढ्यावरील बंधाऱ्यात बुडून माय लेकरांचा एकाच वेळी मृत्यू झाला. तसेच बाळेवाडीत नालाबांधमध्ये बुडून दोन सख्ख्या जुळ्या राम-लक्ष्मण भावाचा एकाचवेळी मृत्यू झाला होता. या घटना ताज्या असतानाच करगणी येथील रामनगरमधील अक्षय जाधव या तरुणाचा बंधाऱ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. तसेच शेटफळे येथे घराची भिंत पडून एक वयोवृद्ध महिला गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत.

तालुक्‍यात चार वेळा अतिवृष्टी झाली. विक्रमी एक हजार मिलिमीटरकडे पावसाची वाटचाल चालू आहे. विजा कोसळून एक जर्सी गायीसह तीन प्राण्यांचा मृत्यू झाला आहे.

संपादन : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shubham's body found 48 hours later; Kargani was carried away by the stream