मी कॉंग्रेसमध्येच राहणार - म्हेत्रे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 31 मार्च 2017

सोलापूर - मी भाजपमध्ये जाणार या फक्त वावड्या आहेत. मी कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यावर मी "राष्ट्रवादी'त जाणार असल्याचे भाकीत भाजपचे ज्येष्ठ नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी केले होते. मात्र तेव्हाही मी कॉंग्रेसमध्येच राहिलो, आताही कॉंग्रेसमध्येच आहे आणि भविष्यातही कॉंग्रेसमध्येच राहणार आहे. त्यामुळे राजकीय भूकंप होणार नाही. या गप्पा माध्यमांनी रंगविल्या आहेत,'' असा खुलासा कॉंग्रेसचे आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी गुरुवारी येथे केला.

संघर्ष यात्रेच्या सोलापूर दौऱ्याची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यात्रा 2 एप्रिलला मोहोळमध्ये येईल. तेथील जाहीर सभेनंतर नेत्यांचा सोलापुरात मुक्काम असेल. तीन एप्रिलला सकाळी दहा वाजता ही यात्रा पंढरपूरकडे रवाना होईल.

प्रत्येक तीन महिन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन घोषणा करीत असल्याने त्यांच्या फसव्या घोषणांची माहिती जनतेला कळाली नाही. नवनवीन घोषणांना भुलून मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला आहे. या घोषणांमधील फोलपणा मतदारांपर्यंत पोचविण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळेच आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही, असे म्हेत्रे यांनी या वेळी सांगितले.

कर्जमाफीचा निर्णय घेण्याचा मुहूर्त मुख्यमंत्र्यांना मिळेनासा झाला आहे. हा मुहूर्त सांगणारा ज्योतिषी त्यांनी शोधावा आणि शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्यावी.
- सिद्धाराम म्हेत्रे, आमदार

Web Title: siddharam mhetre in congress