यंदा समाधानकारक पाऊस; सिद्धेश्वर यात्रेतील भाकणूक

परशुराम कोकणे
बुधवार, 16 जानेवारी 2019

वासराने मुत्र विसर्जन केले यावरून यंदाच्या वर्षात समाधानकारक पाऊस येईल. शेती व्यवस्था बळकट होईल. धान्य, खाद्यपदार्थाला तोंड लावले नाही यावरून महागाई होणार नाही, सर्व दर स्थिती राहतील. सुकाळ राहील. दिवा पाहून वासरू दचकले नाही यावरून भयाचे वातावरण असणार नाही असे श्री. हिरेहब्बू यांनी सांगितले. 

सोलापूर  : यंदा समाधानकारक पाऊस होईल. शेती व्यवस्था बळकट होईल. तसेच सर्वत्र भयमुक्त वातावरण असेल, अशी भाकणूक मंगळवारी रात्री सिद्धेश्‍वर यात्रेत वर्तविण्यात आली. 

होम प्रदीपन सोहळ्यानंतर पालखी, नागफणीसह सर्व नंदीध्वज आणि सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोर जमले. खाली बसलेल्या मानकऱ्यांच्या मागे नागफणीसह सर्व नंदीध्वज लक्ष वेधून घेत होते. प्रारंभी दिवसभर उपाशी असलेल्या वासराची पूजा करण्यात आली. सिद्धेश्‍वर महाराजांचा जयाघोष करत धार्मिक विधीला सुरवात करण्यात आली. वासराने मुत्र विसर्जन केले. समोर ठेवलेल्या कोणत्याही धन्याला, फळाला, खाद्याला तोंड लावले नाही. आरती करताना वासरू दचकले नाही. यानंतर मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी भाकणूक सांगितली. 

वासराने मुत्र विसर्जन केले यावरून यंदाच्या वर्षात समाधानकारक पाऊस येईल. शेती व्यवस्था बळकट होईल. धान्य, खाद्यपदार्थाला तोंड लावले नाही यावरून महागाई होणार नाही, सर्व दर स्थिती राहतील. सुकाळ राहील. दिवा पाहून वासरू दचकले नाही यावरून भयाचे वातावरण असणार नाही असे श्री. हिरेहब्बू यांनी सांगितले. 

राजकीय बाबतीत कोणत्याही प्रकारची भाकणूक करत नाही असे श्री. हिरेहब्बू यांनी स्पष्ट केले. यात्रेतील सर्व धार्मिक विधी वेळेत झाल्या आहेत. भाविकांमधून आनंद व्यक्त होत असल्याचेही त्यांनी सांगितले. पाऊस पडण्याची भाकणूक झाल्याने पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी सुदेश देशमुख, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, नागेश भोगडे, राजशेखर बुरकुले, चिदानंद मुस्तारे आदी उपस्थित होते. भाकणूकीत हिरेहब्बू नेमके काय सांगणार हे ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाकणूकीचा विधी मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत करण्यासाठी तरुणांची धडपड दिसून आली. यावेळी सुरक्षेसाठी पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.

Web Title: siddheshwar yatra in Solapur