म्हसवडला आज सिद्धनाथ रथोत्सव

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

मंगळवारी (ता. 26) कार्तिकी अमावास्या हाेती. त्यामुळे भाविकांचे मोठ्या संख्येने पहाटेपासूनच म्हसवड नगरीत आगमन झाले. मंदिरातही "श्रीं'च्या दर्शनासाठी दर्शन बारीत मोठी रांग होती.

म्हसवड (जि. सातारा) : लाखो भाविकांचे कुलदैवत व श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सिद्धनाथ देवी जोगेश्वरी देवस्थानची वार्षिक रथोत्सव यात्रा आज (ता. 27) आहे. यात्रेस सुमारे चार ते पाच लाख भाविक हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

''सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 
 
यात्रा मंदिरानजीकच्या माण नदीपात्रात बंधारे बांधकामे झाली आहेत व त्यात सध्या मुबलक पाणीसाठा आहे. यामुळे माण नदीच्या पात्रातूच पारंपरिक रथ मिरवणुकीत बदल करून रथ गृह ते पालिका कार्यालयासमोरून बस स्थानकानजीकच्या सातारा- पंढरपूर रस्त्याने रथ मार्गस्थ होणार आहे. या पर्यायी मार्गातील अतिक्रमण, विजेच्या खांबांवरील तारा, रथास अडथळा होऊ शकणाऱ्या मोठ्या झाडांच्या फांद्या तोडून हा रस्ता पालिकेने सुसज्ज केला आहे.

प्रशासनाची सतर्कता

रथ मिरवणुकीच्या वेळी या रस्त्यावर हातगाडे, इतर बैठे व्यवसायधारकांना दुकाने थाटण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. वाहन वाहतुकीस बंदी घालून पर्यायी वाहतुकीची सुविधा करण्यात आली आहे. यात्रा परिसरालगतच्या माण नदीतील खोल पाण्यात भाविक बुडून दुर्दैवी घटना घडू नये, यासाठी यात्रेलगतच माण नदीचे पात्र बंदिस्थ करण्यात आलेले आहे. नदी पात्रात नावेतून पोलिस व मदत पथके तैनात करण्यात आली आहेत.
 
यात्रा कालावधीत भाविक व व्यावसायिकांनाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी पालिकेने यात्रा परिसरात नळ पाणीपुरवठा योजनेंतर्गत सार्वजनिक नळांची सुविधा केली आहे. टॅंकरनेही पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबवला आहे. यात्रा परिसरात जादा पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. शहरातील प्रमुख रस्ते आणि रथ मार्गात भाविक व व्यावसायिक दुकानदारांना धुळीचा उपद्रव होऊ नये, यासाठी रस्त्यावर पाण्याचे फवारे मारण्यात येत आहेत.

हेही वाचा - हुतात्मा ओंबळेंचे स्मारक "लालफितीत'च

 
वाहतुकीसाठी प्रभावशाली उपाययाेजना

प्रत्येक वर्षी रथ मिरवणूक सातारा- पंढरपूर रस्त्यावरून मार्गस्थ होत असताना सुमारे तीन ते चार तास या रस्त्यावरील सर्वच वाहतूक बंद ठेवली जात असे. परिणामी हा रस्ता वाहतुकीच्या कोंडीने व्यापून जात असल्याचे निदर्शनास येते. यंदाही पंढरपूरकडे जाणारी वाहने थांबूच नयेत, यासाठी पोळ पंपापासून शहराच्या बाहेरून वाहने ये- जा करण्याकामी पर्यायी रस्ता काढण्यात आलेला आहे. या प्रभावशाली उपाययोजनेमुळे यंदा सातारा- पंढरपूर रस्ता वाहतूक दिवस रात्र विनाखंड सुरू राहणार आहे. पोळ पेट्रोल पंप ते पोलिस ठाणे चौक दरम्यानचा रस्ता दुभाजक आहे. यामुळे भाविकांना येण्या जाण्यास गर्दीची समस्या जाणविणार नाही.
 
यांत्रिक बोटी तैनात

यात्रेकरूंना आरोग्य सुविधा व दुर्घटना घडल्यास तातडीने रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्यासाठी सुरक्षित ठिकाणे निश्‍चित करून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. यंदा रथमार्गात बदल केल्याने विशेष बाब म्हणून जादा पोलिस बंदोबस्त व माण नदीच्या पात्रात सुरक्षितेच्या बुडीत दुर्घटनेच्या संभाव्य दुर्घटनेच्या दृष्टीने दोन यांत्रिक बोटी तैनात ठेवण्यात आल्या आहेत.
 
यात्रा मैदानात गर्दीवर नियंत्रण राखण्यासाठी उंच टेहेळणी मनोरे उभारण्यात आले आहेत व तेथून व्हिडिओ कॅमेऱ्यांद्वारे निरीक्षण केले जाणार आहे. मंदिर व मंदिर दर्शनबारी व परिसरातह अधिक संख्येने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. 

मानाच्या काट्यांसाठी पर्यायी जागा 

दरम्यान, यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे यात्रा मंदिरानजीकच्या माण नदीच्या पात्रासह सिमेंट कॉंक्रिट बंधारा पूर्ण भरलेला असल्यामुळे नदी पात्रात भाविकांना मुक्कामाची गैरसोय होणार असल्याने गावोगावच्या मुक्कामी आलेल्या मानाच्या काट्या, सासणे यांची पर्यायी जागेत मुक्कामाची सुविधा करण्यात आली आहे. भाविकांना नदी पात्रात जाण्यास सुरक्षतेच्या दृष्टीने प्रतिबंध करण्यात आला असून, पोलिस व गृहरक्षक दल नदी किनारी तैनात करण्यात आले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Siddhnath Rathotsav Today In Mhaswad