इचलकरंजीत राजकीय भूकंप होण्याचे संकेत

पंडित कोंडेकर
गुरुवार, 4 जुलै 2019

राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला इचलकरंजी शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे. राष्ट्रवादीमधील काहीजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. या शिवाय बहुजन वंचित आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात पुढील काळ हा राजकीयदृष्ट्या अधिक धक्कादायक घडामोडींचा असणार आहे. 

इचलकरंजी - नजीकच्या काही दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इचलकरंजी तर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे शिरोळ दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी शहरातील राजकीय क्षेत्रात भूकंप होण्याचे संकेत आहेत. राजकीयदृष्ट्या स्वतंत्र वजन असलेला शहरातील एक मोठा गट भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. त्याची जोरदार चर्चा सध्या शहरात सुरू आहे.

राष्ट्रवादीमधील काहीजण शिवसेनेच्या वाटेवर आहेत. या शिवाय बहुजन वंचित आघाडीकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शहरात पुढील काळ हा राजकीयदृष्ट्या अधिक धक्कादायक घडामोडींचा असणार आहे. 

लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आतापासून शहरात राजकीय हालचालींना गती आली आहे. भाजप आणि काँग्रेस अधिक सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियावर या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. या दोन्ही पक्षाचे उमेदवार आगामी विधानसभा निवडणुकीत असणार आहेत. तुलनेने आघाडी व युती होणार असल्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या गोटात मात्र फारशा हालचाली नाहीत. मात्र राष्ट्रवादीतील जांभळे गटाने उमेदवारीची मागणी करीत खळबळ उडवून दिली आहे.

उमेदवारीसाठी नगरसेवक नितीन जांभळे यांचे नाव पुढे आले असून त्यांनी पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली आहे. बहुजन वंचित आघाडीने लोकसभा निवडणुकीत लक्षणीय मते घेतली होती. त्यामुळे अनेकांना या आघाडीकडून उमेदवारीचे डोहाळे लागले आहेत. राष्ट्रवादीतील कारंडे गटाचे नगरसेवक विठ्ठल चोपडे यांचे नाव सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे.

एकीकडे विधान सभेसाठी संभाव्य उमेदवारांची चर्चा होत असताना आता धक्कादायक राजकीय घडामोडींना सुरुवात होत आहे. शहरातील राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इचलकरंजीत येणार आहेत. त्यांचा दौरा निश्‍चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत.

त्यांच्या उपस्थितीत एक मोठा राजकीय गट भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या हालचालींना वेग घेतला आहे. त्याचा धसका काँग्रेससह अन्य पक्षांनी घेतल्याचे दिसत आहे. प्रवेश करणाऱ्यांची संभाव्य नावे कोणती आहेत, याचा शोध घेत त्यांचे मन परिवर्तन करण्यासाठी या पक्षांची यंत्रणा कामाला लागली आहे. 

शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांचा शिरोळ दौरा निश्‍चित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांना शहरातून मोठे मताधिक्‍य मिळाले. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रवेशासाठी अनेकजण इच्छुक आहेत.

काही कारणास्तव युती फिसकटल्यास शिवसेनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणूक लढविण्याचा प्रयत्न एका विद्यमान नगरसेवकाकडून सुरू आहे. त्यासाठी शिवसेनेला आतापासूनच ताकद देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाटेवर अनेकजण आहेत. पण त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम अद्याप निश्‍चित झालेला नाही. येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याला मुहूर्त मिळण्याची दाट शक्‍यता आहे. शिवसेनेत कोण-कोण जाणार याचीही राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

घडामोडींचा फटका कोणाला बसणार?
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या संभाव्य घडामोडींना विशेष महत्त्व आहे. यातून कोणत्या राजकीय पक्षाला, त्याचबरोबर कोणत्या नेत्याला या घडामोडींचा फटका बसणार, याची आतापासूनच चर्चा रंगत आहे.

पुन्हा नावे चर्चेत
गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून काहीजण अलिप्त होते. आता पुन्हा ते सक्रिय झाले आहेत. त्यांना पुन्हा राजकीय प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेली अशी नावे आता पुन्हा या निमित्ताने चर्चेत येत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sign of political earthquake in Ichalkaranji