पंढरपूर : अवकाळी पावसाचा "कार्तिकी'ला फटका 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

 कार्तिकी यात्रेसाठी सुमारे अडीच लाख भाविक येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गुरुवारी सहा क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंत गेली होती. तथापी अवकाळी पावसाचा फटका यात्रेला बसला असून यात्रेकरुंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जाणवत आहे. 

पंढरपूर : कार्तिकी यात्रेसाठी सुमारे अडीच लाख भाविक येथे दाखल झाले आहेत. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग आज गुरुवारी सहा क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंत गेली होती. तथापी अवकाळी पावसाचा फटका यात्रेला बसला असून यात्रेकरुंच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे जाणवत आहे. 

कार्तिकी यात्रेमुळे श्री विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग , स्टेशन रस्ता आदी भागात वारकऱ्यांची गर्दी आहे परंतु दरवर्षीच्या तुलनेत भाविकांची संख्या कमी दिसत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सहा क्रमांकाच्या पत्राशेड पर्यंत गेली आहे. सुधाकर मल्लप्पा बिरजे (रा.बेकींगरे ता.जि.बेळगाव) म्हणाले, रात्री साडे नऊ वाजता दर्शन रांगेत उभा राहिलो आज सकाळी साडे नऊ वाजता दर्शन झाले. दर्शन रांगेत घुसखोरी होत होती परंतु पोलिस बघ्याची भूमिका घेत होते. 

उजनी धरणातून नदीत पाणी सोडण्यात आलेले असल्याने नदीची पातळी वाढलेली आहे. त्यामुळे नदीत कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले हे जाणीवपूर्वक लक्ष देत होते. ढोले यांनी भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करुन तिथे तैनात जिवरक्षक, होडीचालक आणि एसडीआरएफच्या जवानांना सूचना दिल्या.

दरम्यान, अनेक ठिकाणी स्वतः फिरुन त्यांनी भाविकांना दिल्या जात असलेल्या सोईसुविधांची पाहणी केली. नदीच्या तिरावर महिलांना कपडे बदलण्यासाठी मंदिर समितीकडून दरवर्षी यात्रे दरम्यान चेंजींग रुम उभारण्यात येतात. यंदा मात्र नदीची पाण्याची पातळी वाढल्याने चेंजींग रुम उभारण्यास जागाच शिल्लक राहिली नाही.त्यामुळे महिलांना गैरसोयीला सामोरे जावे लागत होते. 

श्री विठ्ठलाच्या मुख दर्शनाची रांग दरवर्षी संभाजी चौकातून चौफाळ्याकडे नेली जाते.त्यामुळे वाहतूकीला अडथळा होतो हे लक्षात घेऊन यंदा प्रथमच मुखदर्शनाच्या रांगेसाठी तात्पुरता उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे मुखदर्शन रांग उड्डाणपूलावरून गौतम विद्यालयाकडे नेण्यात येणार आहे.मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी अनेक बाबतीत अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली असून त्यामुळे भाविकांना सुलभतेने दर्शन होण्यास मदत होत आहे. 

चंद्रभागा घाटा लगत उभारण्यात आलेल्या आपत्कालीन केंद्रावरुन ध्वनीक्षेपकावरुन भाविकांना खोल पाण्यात न जाण्याच्या सूचना दिल्या जात होत्या. नदीची पाण्याची पातळी वाढल्याचे लक्षात घेऊन भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने होडी चालकांना होड्या चालवण्यास मनाई केली आहे. या संदर्भात होडी चालक उमेश तारापूरकर म्हणाले, ""सुमारे दिडशे होडी चालकांचा उदरनिर्वाह होड्या चालवून होतो. नदीचे पाणी पातळी कालच्या पेक्षा कमी झालेली असल्यामुळे होड्या चालवण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी.'' 

मंदिरांना विद्युतरोषणाई- कार्तिकी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल मंदीरासह परिसरातील विविध मंदीरे, यात्री निवास परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सायंकाळी हे दृश्‍य अतिशय विलोभनीय दिसत आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Significant decrease in the number of pilgrims in pandhrpur