कोल्हापुरात ७७ किलो चांदीसह ठेकेदार पसार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

कोल्हापूर - सराफ व्यावसायिकाकडून मूर्तीसाठी घेतलेली सुमारे २५ लाखांची ७७ किलो चांदी घेऊन ठेकेदार पसार झाल्याचा प्रकार तेली गल्लीत घडला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद सराफ व्यावसायिक पप्पूसिंह गुमानसिंह देवडा (वय ३९, शास्त्रीनगर) यांनी दिली.

कोल्हापूर - सराफ व्यावसायिकाकडून मूर्तीसाठी घेतलेली सुमारे २५ लाखांची ७७ किलो चांदी घेऊन ठेकेदार पसार झाल्याचा प्रकार तेली गल्लीत घडला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसांत झाली. याबाबतची फिर्याद सराफ व्यावसायिक पप्पूसिंह गुमानसिंह देवडा (वय ३९, शास्त्रीनगर) यांनी दिली. मेहबूब राजेसाब टिनवाला (मूळ वडगाव, बेळगाव, सध्या रा. तेली गल्ली, शुक्रवार पेठ) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती, पप्पूसिंह देवडा यांचे भेंडे गल्लीत ‘राज ज्वेलर्स’ नावाचे दुकान आहे. चांदीच्या मूर्ती, मुखवटे, ग्लास विक्रीचा ते व्यवसाय करतात. मुख्य ठेकेदार म्हणून संशयित मेहबूब राजेसाब टिनवाला काम करत होता. तेली गल्लीत भाडेकरू होता. तेथेच त्याचा कारखाना आहे. तो लागेल तशी चांदी देवडा यांच्याकडून घेऊन मूर्ती तयार करून देत होता.

देवडा यांच्याकडून १५, १६ आणि १९ जुलै दरम्यान टप्प्याटप्याने सुमारे ४२ किलो चांदी नेली होती. पुन्हा त्याने २३ जुलैला एका कामगारास देवडा यांच्याकडे पाठवून १५ किलोहून अधिकची चांदी घेऊन गेला होता. ही चांदी तो कारखान्यातील लोखंडी तिजोरीत ठेवत होता. कारागिरांना लागेल तशी तो त्यांना चांदी देत होता.

दरम्यान, तयार मूर्ती आल्या नाहीत म्हणून देवडा यांनी २४ जुलैला मेहबूबला फोन लावला. मात्र, त्याचा मोबाईल बंद होता. कामगाराला फोन करताच त्याने मेहबूब सकाळीच बेळगावला गेल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशीही चौकशी केल्यानंतर तो घरी आला नसल्याचे त्यांना समजले. त्यानंतर देवडा यांनी त्याच्या कारखान्यात धाव घेतली; पण कारखाना बंद होता. कामगारांकडे चौकशी केल्यानंतर मेहबूब आला नसल्याचे समजले.

तिजोरीच्या चाव्या पत्नीकडेही दिल्या नसल्याचे समजले. कामगाराने चाव्या शोधून तिजोरी उघडल्यानंतर सुमारे ७६ किलो चांदी आणि मूर्ती, वस्तू नसल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी लक्ष्मीपुरीत फिर्याद दिली. त्यानुसार संशयित महेबूब टिनवालावर २४ लाख ९५ हजार ८०० रुपयाची चांदी लंपास केल्याचा गुन्हा दाखल झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: silver theft case in Kolhapur