सांगलीत नवव्या दिवशी घरगुती बाप्पांना साधेपणाने निरोप

अजित कुलकर्णी 
Monday, 31 August 2020

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने होत आहे. रविवारी नवव्या दिवशी घरगुती गणपतींचे अत्यंत साधेपणाने विसर्जन करण्यात आले.

सांगली : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा गणेशोत्सव साधेपणाने होत आहे. रविवारी नवव्या दिवशी घरगुती गणपतींचे अत्यंत साधेपणाने विसर्जन करण्यात आले. कृष्णा नदीकाठावर विसर्जनासाठी तुरळक गर्दी होती. मिरवणुका, वाद्यवृंद, आतषबाजीसह सर्वच गोष्टींना फाटा दिल्याने उत्साह कमी होता. "पुढच्या वर्षी लवकर या पण लवकर कोरोनामुक्‍त करा', असे साकडे भक्‍त-भाविकांनी घातले. 

कोरोना संसर्गाच्या प्रतिबंधासाठी यंदा शासनाने गणेशोत्सवासाठी नियमावली तयार केली होती. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे काम पोलिस प्रशासनाने केले. मिरवणुका, रंगारंग कार्यक्रमासह गणरायाच्या प्रतिष्ठापनेपासून वाढत जाणाऱ्या उत्साहाला विसर्जनावेळी उधाण येते. सांगलीतील बहुतांश सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचे नवव्या दिवशी विसर्जनाची परंपरा आहे. शहर व परिसरातील सुमारे 400 मंडळांच्या भव्य विसर्जन मिरवणुका निघतात. विश्रामबाग, विजयनगर, दक्षिण शिवाजीनगर, खणभाग, शंभर फुटी परिसरातील मंडळे गणपती पेठेतून मंदिरासमोर आरती करुन पुन्हा टिळक चौकातून सरकारी घाटाकडे मार्गस्थ होतात. मात्र यंदा त्या परंपरेत कोरोनामुळे खंड पडल्याचे चित्र होते. मंडळांनी आपल्या वाहनातून साधेपणाने गणरायाला आणून विसर्जन केले. 

विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या वाहनांसाठी वैरण बाजारात सोय केल्याने गर्दी टळली. नदी परिसरात निर्माल्य संकलनासाठी ठेवलेल्या कुंडात निर्माल्य टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते. ठिकठिकाणी बॅरिकेट लावून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

स्वागत परंपरेला यंदा ब्रेक 
टिळक चौक गणेशोत्सव मंडळ, हिंदू एकता आंदोलन, युवाशक्‍ती व्यसनमुक्‍ती व एडस प्रतिबंध संस्कार केंद्रातर्फे गेल्या 38 वर्षांपासून स्वागत कमान उभारली जाते. मिरवणुकीतील संबंधित मंडळाचे वैशिष्ट्य, परंपरा, उपक्रमाची माहिती देऊन पदाधिकाऱ्यांचे स्वागत व सत्कार करण्याची परंपरा आहे. सन 2005 व 2019 च्या महापुरानंतर आलेल्या गणेशोत्सवातही स्वागत कमानीची परंपरा सुरु होती. मात्र यंदा कोरोनामुळे प्रथमच या परंपरेत खंड पडल्याचे दु:ख विजय कडणे यांनी व्यक्‍त केले.  
 

संपादन : प्रफुल्ल सुतार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Simple farewell to the household Bappas in Sangli