संस्थानच्या मानाच्या "श्री' चे साधेपणाने विसर्जन...रथातील मिरवणूक यंदा रद्द : शेकडो भाविकांची घाटावर उपस्थिती 

घनश्‍याम नवाथे
Wednesday, 26 August 2020

सांगली-  येथील श्री गणपती पंचायतन संस्थानच्या मानाच्या "श्रीं' ची विसर्जन मिरवणूक यंदा कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कित्येक वर्षाच्या इतिहासात प्रथमच रद्द करण्यात आली. आज दुपारी राजवाडा चौकातील दरबार हॉलमध्ये आरती झाल्यानंतर पंचायतन प्रशासनच्या मोटारीतून बाप्पांचे गणपती पेठेतील मुख्य मंदिरात आगमन झाले. तेथे दर्शन झाल्यानंतर थेट सरकारी घाटावर होडीतून कृष्णा नदीच्या मुख्य प्रवाहात "श्रीं' चे विसर्जन करण्यात आले. सरकारी घाटावर आणि आयर्विन पुलावर जमलेल्या शेकडो भाविकांनी "मोरया' च्या गजरात भावपूर्ण निरोप दिला. 

सांगलीतील संस्थानचा गणेशोत्सव प्रतिवर्षी उत्साहात साजरा होतो. दरबार हॉलमधून सजवलेल्या रथातून निघणारी मिरवणूक, ढोल-ताशांचा गजर, झांज, बेंजो, लेझीम नृत्य, घोडेस्वारी आणि पारंपारिक वेशभूषेच्या थाटात निघणारी मिरवणूक म्हणजे सांगलीकरांसाठी आकर्षण असते. सांगली जिल्ह्यासह प्रतिवर्षी मिरज पूर्व भाग, कर्नाटकातून हजारो भाविक मिरवणूक पाहण्यासाठी येतात. परंतू यंदा गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आले आहे. त्यामुळे संस्थानने देखील पारंपारिक उत्सवाला फाटा देत यंदा साधेपणाने उत्सव व विसर्जन केले जाईल असे जाहीर केले होते. 

मानाच्या "श्री' ची विसर्जन मिरवणूक निघणार नसली तरी आज दर्शनासाठी राजवाडा चौकातील दरबार हॉलसमोर भाविकांनी गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्त तैनात होता. तसेच संस्थानचे रक्षक उपस्थित होते. दरबार हॉलमध्ये श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन, राजलक्ष्मी पटवर्धन, पौर्णिमाराजे पटवर्धन, संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर, प्रकाश वेळापूरे आदींच्या उपस्थितीत विधीवत पूजा आणि आरती झाल्यानंतर मुख्य दरवाजा उघडला गेला. त्यानंतर "श्रीं' ची मूर्ती पंचायतन प्रशासनच्या मोटारीत विराजमान झाली. राजवाडा चौकातून हरभटरस्ता मार्गे गणपती मंदिरात "श्रीं' चे आगमन झाले. तेथे दर्शन आणि आरती झाली.

त्यानंतर थेट सरकारी घाटावर मोटारीतून लवाजमा आला. तेव्हा काहीजणांनी पेढ्यांची उधळण केली. होडीमधून मूर्ती नदीपात्रात मुख्य प्रवाहात नेण्यात आली. घाटावरील आणि पुलावरील भाविकांना अभिवादन केल्यानंतर होडीमध्ये आरती झाली. त्यानंतर "मोरया' च्या गजरात भावपूर्ण निरोप देण्यात आला. एरव्ही दुपारी तीन ते रात्री आठपर्यंत पाच तास चालणारी मिरवणूक यंदा रद्द केल्यामुळे अवघ्या अर्धा तासात विसर्जन झाले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The simple immersion of the esteemed "Shri" of the Sansthan